एसटी कर्मचाऱ्यांनी पुन्हा दिला आंदोलनाचा इशारा!

एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलिनीकरण व्हावे, म्हणून राज्यभरातील एसटी कर्मचारी आझाद मैदानावर गेली पाच महिने आंदोलनावर ठाम होते. न्यायालयाने संपकरी एसटी कर्मचाऱ्यांना कामावर रूजू होण्यासाठी २२ एप्रिलपर्यंतचा अल्टिमेटम दिला होता. यानंतर राज्यात विविध आगारात एसटी कर्मचारी सेवेत रुजू झाले. गेल्या पाच महिन्यांपासून सुरू असलेले आंदोलन निवळत असताना दिवाळीनंतर आता पुन्हा एकदा संपकरी एसटी कर्मचाऱ्यांनी विलीनीकरणासाठी आंदोलन छेडणार असल्याचा इशारा दिला आहे.

कोण करणार नेतृत्व?

मिळालेल्या माहितीनुसार, या आंदोलनापूर्वी एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलिनीकरण व्हावे, या एक प्रमुख मागणीसह राज्यातील संपूर्ण आगारात आंदोलनासाठी मोर्चेबांधणी केली जाणार आहे. एसटी लढा विलीनीकरणाचा महाराष्ट्र राज्याचे सदस्य सतीश मेटकरी यांनी विलीनीकरणासाठी राज्यातील प्रत्येक आगारात कर्मचाऱ्यांशी संवाद साधला जाणार असल्याचे सांगितले. या आंदोलनाचे नेतृत्व आमदार गोपीचंद पडळकर करणार असल्याचेही माहिती त्यांनी दिली.

(हेही वाचा – ६ हजार संपकऱ्यावर कारवाईची टांगती तलवार! एसटी महामंडळाचा आक्रमक पवित्रा)

११५ कर्मचाऱ्यांच्या नोकरीवर टांगती तलवार

विलिनीकरणाची मागणी आणि आत्महत्या केलेल्या कर्मचाऱ्यांबद्दल सहानुभूती न दाखविल्याबद्दल एसटी कर्मचाऱ्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक बंगल्यावर हल्ला केला. केलेल्या या हल्ल्यात सामील असलेल्या ११५ एसटी कर्मचाऱ्यांच्या नोकरीवर टांगती तलवार आहे. दरम्यान, जामिनावर असलेल्या या कर्मचाऱ्यांवर महामंडळाकडूनही कारवाई करण्यासाठी पोलिसांकडूनही अहवाल मागवण्यात आल्याची माहिती महामंडळाने दिली. लवकरच त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याचे महामंडळाने स्पष्ट केले.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here