मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर सीमाशुल्क विभागाने (कस्टम) वेगवेगळ्या कारवाईत सोन्याची तस्करी करणाऱ्या ७ जणांना अटक केली आहे. या सात जणांकडून सुमारे १५ किलो सोनं आणि २२ लाख रुपयांचे परदेशी चलन जप्त करण्यात आले आहे.
(हेही वाचा – अनिल परबांच्या साई रिसॉर्ट संदर्भात नवी अपडेट, सोमय्यांनी ट्वीट करून दिली माहिती)
छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ येथील सीमाशुल्क विभागाच्या अधिकाऱ्याना गुप्त माहितीदाराकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे दुबईहून एमिरेट्स फ्लाइटने आलेल्या एका भारतीय नागरिकाला ५.२० कोटी रुपयांच्या ९.८९५ किलो सोन्यासह पकडण्यात आले. सीमाशुल्क बुडवून बेकायदेशीररित्या हे सोनं भारतात आणण्यासाठी या प्रवाशाने टेलरकडून सोनं लपविण्यासाठी खास डिजाईन असलेला सदरा शिवून घेतला होता. या सदऱ्याच्या आत तयार करण्यात आलेल्या कप्प्यात त्याने सोन्याचे बार दडवून आणले होते अशी माहिती सीमाशुल्क अधिकारी यांनी दिली. हे सोनं त्याने दुबई येथून आणले होते, दुबईत त्याला एका सुदानी नागरिकाने हे सोनं मुंबईत पोहचविण्यासाठी दिले होते, अशी माहिती त्याने सीमाशुल्क अधिकारी यांना दिली.
दरम्यान, दुसऱ्या कारवाईत चेन्नई येथून मुंबईत आलेल्या एका प्रवाशाने अंतर्वस्त्रात सोन्याची पावडर दडवून आणली होती, ही सोन्याची पावडर (सोन्याचा कस) घेऊन तो प्रथम शारजाह येथून चेन्नई येथे उतरला व तेथून तो इंडिगो विमानाने मुंबईत आला होता. त्याच्याजवळ १किलो ८७५ ग्रॅम सोन्याची पावडर जप्त करण्यात आली. सौदीया येथून आलेल्या दोन भारतीय नागरिकांजवळून ५६ लाख ८१ हजार रुपयांची सोन्याची पावडर जप्त करण्यात आली आहे, तर ५१लाख १७ हजार रुपये किमतीचे सोण्याची पावडर एका दुबई येथून एमिरेटस विमानाने आलेल्या प्रवाशाकडून जप्त करण्यात आली आहे. सीमाशुल्क विभागाने ११ ऑक्टोबर ते १२ ऑक्टोबर दरम्यान एकूण ६ वेगवेगळ्या कारवाईत सुमारे ८ कोटींच्या सोन्यासह २२लाख रुपयांचे परदेशी चलन जप्त करण्यात आले आहे. याप्रकरणात ७ जणांना अटक करण्यात आली आहे.
Join Our WhatsApp Community