नववर्षाच्या पूर्वसंध्येला मुंबईत 3 कोटी रुपयांचा ड्रग्स जप्त

शहरात ३१ डिसेंबरच्या पार्टीमध्ये ड्रग्सचा पुरवठा करण्यासाठी आलेल्या तीन नायजेरियन नागरिकांना मुंबई पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने अटक केली आहे. या तिघांकडून सुमारे ३ कोटी १० लाख रुपयांचे ड्रग्स जप्त केले आहे. जप्त करण्यात आलेल्या ड्रग्जमध्ये कोकेन, एमडी या ड्रग्सचा समावेश आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींचे आंतरराष्ट्रीय ड्रग्ज पुरवठा करणाऱ्या टोळीशी संबंध असून आरोपी हे  हायप्रोफाईल लोकांना ड्रग्ज विकायचे, अशी माहिती समोर आली आहे.

वाशी चेक नाक्याजवळ अंमली पदार्थांची विक्री व्हायची

अमली पदार्थ विरोधी पथकाच्या म्हणण्यानुसार, ३१ डिसेंबर रोजी संपूर्ण शहरात सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली होती आणि अमली पदार्थ विरोधी पथके शहराच्या प्रत्येक भागात गस्त घालत होती. वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स रोड जवळ पोलिस गस्त करत असताना एक नायजेरियन नागरिक तेथून जाताना दिसला आणि पोलिसांना त्याचा संशय आला. त्याचे हावभाव संशयास्पद वाटल्याने  पोलिसांनी त्याला थांबवून त्याच्या झडतीतून १०५  ग्रॅम कोकेन आणि १२०  ग्रॅम एमडी ड्रग्ज जप्त केले. त्याच्याकडे केलेल्या अधिक चौकशीत त्याने त्याचे नाव इबे माईक (३९) असे असल्याचे सांगून हे ड्रग्स त्याने ओडिफे बार्थोलोम्यू (४०) आणि मोंडे इग्वु (३८) यांच्याकडून खरेदी केल्याचे सांगितले. हे दोघेही वाशी चेक नाक्याजवळील झुडपात लपून अंमली पदार्थांची विक्री करतात, अशी माहिती माईकने पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी बार्थोलोम्यू आणि इग्वू यांना वाशी चेक नाक्याजवळून अटक केली. पोलिसांना बार्थोलोम्यू येथून १२०  ग्रॅम कोकेन आणि ८५० ग्रॅम एमडी ड्रग्ज सापडले, तर इग्वू याच्याकडून  १८०  ग्रॅम कोकेन, ३५०  ग्रॅम एमडी आणि २३५  ग्रॅम एमडीएमए ड्रग्ज सापडले. या तिघांकडून जप्त करण्यात आलेल्या ड्रग्जची किंमत ३ कोटी १८ लाख रुपये आहे.

कपड्याच्या व्यापाराच्या नावाखाली ड्रग्जचा व्यापार करत

पोलिस उपायुक्त  दत्ता नलावडे यांनी सांगितले की, अटक आरोपी इबे माईकवर यापूर्वी बंगळुरू, कर्नाटक येथे ड्रग्जचा गुन्हा दाखल आहे आणि आम्हाला संशय आहे की, या लोकांचे आंतरराष्ट्रीय ड्रग तस्करांशी संबंध असावेत. ‘यामध्ये आणखी नायजेरियन नागरिकांचा सहभाग असू शकतो’, अशी माहिती दत्ता नलावडे यांनी दिली. अंमली पदार्थांच्या तस्करीत गुंतलेले नायजेरियन नागरिक कपड्याच्या व्यापाराच्या नावाखाली ड्रग्जचा व्यापार करत असल्याचे आढळून आले असल्याचे नलावडे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. ही टोळी मुंबईतील बड्या ग्राहकांना ड्रग्सचा पुरवठा करीत असून या बड्या ग्राहकांचा शोध घेण्यात येत असल्याची माहिती अमली पदार्थ विरोधी पथकाच्या एका अधिकाऱ्याने दिली आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here