मुंबईतील भुलेश्वर या ठिकाणी असलेल्या अंगाडीयाच्या कार्यालयात अज्ञात चोरट्यांनी एक कोटी रुपयांची घरफोडी केल्याची घटना उघडकीस आली आहे. चोरट्यांनी बनावट चावीचा वापर करून कार्यालयातून सुमारे १ कोटी रुपयांची रोकड चोरी करून पोबारा केला आहे. याप्रकरणी व्ही.पी.रोड पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध घरफोडीचा गुन्हा दाखल केला आहे.
भुलेश्वर मार्केट भोईवाडा गल्ली या ठिकाणी असलेल्या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर केतन पटेल यांचे अंगाडीया कुरिअर सर्व्हिसचे कार्यालय आहे. या कार्यालयातून सोनं, चांदी, हिरे आणि रोख रक्कम कुरिअरच्यामार्फत पोहचवण्याचा व्यवसाय आहे. .
शनिवारी दुपारी पटेल हे कार्यालय बंद करून काही कामानिमित्त बाहेर गेले होते. सायंकाळी पुन्हा कार्यालयात आले असता चोरी झाल्याचा प्रकार समोर आला. पटेल यांनी सीसीटीव्ही तपासले असता तीन इसम चेहऱ्याला मास्क लावून बनावट चावीने कुलूप उघडून १ कोटी रुपयांची रोकड लांबवल्याचे समोर आले. पटेल यांनी तत्काळ व्ही. पी .रोड पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. सुत्रांच्या म्हणण्यानुसार चोरी करणारी व्यक्ती ही ओळखीची आहे का? याप्रकरणी तपास सूरु आहे.
Join Our WhatsApp Community