ठाणे खाडीतील फ्लेमिंगोच्या अधिवासाला आंतरराष्ट्रीय मान्यता मिळाली आहे. केंद्रीय वने व पर्यावरण आणि वातावरणीय बदल मंत्रालयाने ठाणे खाडीला रामसर स्थळ म्हणून शनिवारी जाहीर केले. ठाणे खाडी देशातील पहिले शहराजवळ रामसर क्षेत्राचा दर्जा मिळालेले पाणथळ स्थळ आहे. याआधी राज्यातील नाशिक जिल्ह्यातील नांदूर मधमेश्वर आणि बुलढाणा जिल्ह्यातील लोणार सरोवर ही ठिकाणे रामसर स्थळ म्हणून जाहीर झालेली आहेत. ठाणे खाडीच्या घोषणेमुळे राज्यात आता तीन रामसर स्थळे झाली आहेत.
( हेही वाचा : तूर डाळींच्या साठ्यांची माहिती साठेधारकांनी पोर्टलवर उघड करावी, केंद्र सरकारचे राज्यांना निर्देश)
रामसर कनव्हेक्शनकडून केंद्रीय पर्यावरण, वने आणि वातावरणीय बदल मंत्रालयाला शनिवारी याबाबतची माहिती दिली गेली. रामसर कनव्हेक्शनने महिनाभराच्या आतच देशातील रामसर स्थळांबाबत केलेली ही दुसरी घोषणा आहे. गेल्याच आठवड्यात रामसर कनव्हेक्शनने देशातील १५ पाणथळ जागा रामसर स्थळ म्हणून जाहीर केल्या होत्या. शनिवारी रामसर कनव्हेक्शनने अजून ११ स्थळांना रामसर स्थळांचा दर्जा मिळाल्याचे जाहीर केले. त्यामुळे देशातील रामसर स्थळांची एकूण संख्या ७५ पर्यंत पोहोचली आहे.
२०१७ साली ठाण्यातील फ्लेमिंगोच्या अधिवासाला हक्काचे स्थान मिळावे म्हणून ३० एप्रिल रोजी राज्याचे तत्कालीन वनमंत्री सुधीर मुनगुंटीवार यांच्या हस्ते ठाणे खाडी फ्लेमिंगो अभयारण्याचे उद्घाटन झाले होते. ठाणे खाडी क्षेत्रातील ६ हजार ५२२.५ हेक्टर भूभागापैकी १ हजार ६९.५ हेक्टर ठाणे खाडी फ्लेमिंगो अभयारण्याचे क्षेत्र आहे. उर्वरित ४ हजार ८३२ हेक्टर क्षेत्र अभयारण्याचा पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील क्षेत्राचा भाग आहे.
गेल्या वर्षी राज्यसरकारकडून केंद्राला दिलेला प्रस्ताव
वनविभागाच्या कांदळवन कक्षाने ठाणे खाडीला रामसर दर्जा मिळावा , यासाठी ८ जुलै २०२१ रोजी हा प्रस्ताव तयार केला होता. हा प्रस्ताव राज्याच्या पर्यावरण आणि वातावरण बदल मंत्रालयाने ९ डिसेंबर २०२१ रोजी मंजूर केला. राज्य सरकारने हा प्रस्ताव केंद्रीय पर्यावरण, वने आणि वातावरण बदल मंत्रालयास मंजूरीसाठी पाठवला.
ठाणे खाडीबद्दल –
- आशियातील सर्वात मोठी खाडी असलेल्या ठाणे खाडी ही मुंबईच्या किनारपट्टी भागांजवळ वसलेली आहे. मुंबई, ठाणे आणि नवी मुंबई असे तिन्ही शहरांच्या किनारपट्टी भागांत ठाणे खाडीचा भूभाग आढळतो.
- ठाणे खाडीच्या काठावर कांदळवनाचे क्षेत्र आहे. देशात आढळून येणा-या २० टक्के खारफुटींच्या प्रजाती ठाणे खाडीत आढळतात.
- स्थलांतरित पक्षी भारतात पाणथळ जागा आपल्या उड्डाण मार्गातील प्रवासाचा थांबा म्हणून वापरतात.
- या स्थलांतरित पक्ष्यांचा मध्य आशियाई मार्गातील ठाणे खाडी हा महत्त्वाचा थांबा आहे. हिवाळ्यात स्थलांतरित पक्षी मोठ्या संख्येने ठाणे खाडीत पहायला मिळतात. त्यापैकी ग्रेटर आणि लेसर या दोन्ही फ्लेमिंगो पक्ष्याच्या दोन प्रजाती लाखोंच्या संख्येने खाडी परिसराला हिवाळ्यात भेट देतात.