मुंबईत ३ ठिकाणी बॉम्बस्फोट हल्ल्याची धमकी देणाऱ्या अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल

109

ऐन दिवाळीच्या पार्श्वभूमीवर अंधेरी, जुहूसह मुंबईत तीन ठिकाणी धमकीचा कॉल मुंबई पोलिसांच्या हेल्पलाईन क्रमांकावर आला. या धमकीच्या कॉलमुळे मुंबईत एकच खळबळ उडाली असून पोलिसांनी धमकी देण्यात आलेल्या तिन्ही ठिकाणी तपासणी देखील केली आहे. यादरम्यान पोलिसांना काहीही संशयास्पद आढळलेले नाही. मात्र आता या धमकी प्रकरणी मुंबई पोलिसांनी एका अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

(हेही वाचा – महापालिका कर्मचाऱ्यांना ऑक्टोबरच्या पगारात मिळणार वाढ; या भत्याची मिळणार थकबाकीची रक्कम!)

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील आझाद मैदान पोलिसांनी अज्ञात व्यक्तिविरोधात कलम 505 (1)(B), 170, 182 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. मुंबईत तीन ठिकाणी बॉम्ब हल्ल्याची धमकी देणारा फोन 18 ऑक्टोबर रोजी मुंबई पोलीस हेल्पलाईनवर आला होता. फोन करणाऱ्या अज्ञात व्यक्तीने मुंबईतील पश्चिम उपनगरातील जुहू येथील पीव्हीआर सिनेमा, पार्ल्यातील सहारा हॉटेल आणि अंधेरीतील इन्फिनिटी मॉल बॉम्बने उडविण्यात येणार असल्याचा धमकीचा कॉल मंगळवारी रात्री केला. यानंतर मुंबई पोलिसांकडून याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कॉल करणाऱ्या अज्ञात व्यक्तीने केलेल्या या कॉलची दखल घेऊन तात्काळ ज्या ठिकाणांची नावे देण्यात आली तेथील संबंधित पोलीस ठाण्यांना सतर्क करण्यात आले होते. तसेच बॉम्ब निकामी आणि शोधक पथकाला सदर ठिकाणी पाचारण करून तिन्ही ठिकाणी तपास सुरू करण्यात आला होता. ऐन सणासुदीच्या काळात कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून परिसरात पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे, त्याच बरोबर नाकाबंदी, हॉटेल तपासणी सुरू करण्यात आल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली होती.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.