Mumbai Building Collapse Update: कुर्ला पूर्व इमारत दुर्घटना; एकाला अटक

82
कुर्ला पूर्व येथील वत्सलाताई नाईक नगर येथील इमारत दुर्घटना प्रकरणात नेहरू नगर पोलिसांकडून या धोकादायक इमारतीत घरे भाड्याने देऊन भाडेकरूंना मृत्यूच्या दाढेत लोटणाऱ्या घरमालकांची माहिती काढण्यात येत आहे. त्यामुळे भाड्याने घर देणाऱ्या तसेच सोसायटीचे पदाधिकारी यांच्या अडचणी वाढल्या आहेत. कुर्ला पूर्व नेहरु नगर इमारत दुर्घटना प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला असून एकाला अटक करण्यात आली आहे.
दिलीप विश्वास असे अटक करण्यात आलेल्या एकाचे नाव असून, तो एक बांधकाम व्यवसायिकाचा जवळील व्यक्ती आहे. त्यानेच मजुरांना दुर्घटनाग्रस्त इमारतीत घर भाडयाने घेऊन दिले होते, भाड्याचा करारदेखील त्यानेच बनवला होता. नेहरू नगर पोलिसांनी ३०४(२), ३०८,३३७,३३८,३४ भादवी अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

१९६६ मध्ये उभारली इमारत

कुर्ला पूर्व येथील वत्सलताई नाईक को-ऑप- हौसिंग सोसायटीच्या चार विंग असलेल्या इमारतींपैकी एक इमारत सोमवारी मध्यरात्री १२ वाजण्याच्या सुमारास कोसळून झालेल्या दुर्घटनेत १९ जणांचा मृत्यू झाला असून, १४ जण जखमी झाले आहेत. सदर इमारतीची जागा ही तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी बंजारा समाजाला दिली होती. त्या ठिकाणी बंजारा समाजाने सोसायटी तयार करून त्या जागेवर चार इमारती सन १९६६मध्ये उभ्या केल्या होत्या.

महापालिकेने नोटीस दिल्यानंतरही अनेक जण वास्तव्यास

काही वर्षांनी या इमारतीत राहणारे काही जण घरे विकून गेले. इमारत उभी राहिल्यापासून या इमारतीची डागडुजी करण्यात न आल्यामुळे इमारत कमकुवत झाली होती. मागील काही वर्षांपूर्वी मुंबई महानगरपालिकेने या चारही विंग धोकादायक  घोषित करून इमारत रिकामी कारण्यासाठी प्रत्येकाला नोटीस बजावल्या होत्या. महानगरपालिकेने या इमारतीचे वीज पाणी कापल्यानंतर अनेकांनी येथील घरे रिकामी केली होती, तर काही जण परिस्थितीमुळे या धोकादायक इमारतीत राहत होते. अनेकांनी आपले घर मजुरांना भाड्याने दिले होते. इमारती जवळील चाळीतून वीज पाणी मिळवून हे मजूर दिवस काढत होते. ७ ते ८ हजार रुपयांत मुंबईत भाड्याने घर मिळत असल्यामुळे, अनेक ठेकेदारांनी आपल्या मजुरांची येथे राहण्याची सोय केली होती, अशी माहिती आजूबाजूला असलेल्या चाळीतील रहिवाशांनी दिली.
इमारत धोकादायक असून कुठल्याही क्षणी दुर्घटना होऊ शकते, हे माहीत असूनदेखील  केवळ ७ ते ८ हजार रुपयांच्या भाड्यासाठी मूळ मालकांनी मजुरांचा जीव धोक्यात घातला होता, तर सोसायटीच्या पदाधिका-यांनी देखील आक्षेप घेतला नव्हता अशी माहिती समोर येत आहे. या दुर्घटनेनंतर हा सर्व प्रकार समोर येत असून नेहरू नगर पोलिसांनी अद्याप या दुर्घटने प्रकरणी गुन्हा दाखल केलेला नसला तरी लवकरच या प्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची शक्यता असल्यामुळे भाड्याने घर देणा-या मालकांच्या अडचणीदेखील वाढणार असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.