मुंबईत पावसाळ्यात मुंबई सेट्रल येथील नायर रुग्णालय, मराठा मंदिरासह महालक्ष्मी रेल्वे स्थानक परिसरात तुंबणाऱ्या पाण्यावर आता मात केली जाणार आहे. या तुंबणाऱ्या पाण्यावर आता महापालिकेच्यावतीने उपाय शोधण्यात आला आहे. त्यामुळे आता महालक्ष्मी रेल्वे स्थानकाच्या परिसरात मिनी पंपिंग स्टेशन बसवून भूमिगत पर्जन्य जलवाहिनी टाकण्यात येत आहे.
( हेही वाचा : ‘वरळीच्या महाराजा’लाच महापालिकेचा दे धक्का )
भूमिगत पर्जन्य जलवाहिनी
मुंबई महापालिकेच्या जी दक्षिण विभागातील महालक्ष्मी रेल्वे स्थानक परिसर ते डॉ.ई मोझेस मार्ग येथे दरवर्षी पावसाळी पाणी तुंबले जात असल्याने त्या पाण्याचा निचरा करण्यासाठी १ हजार क्युबीक मीटर प्रति तास क्षमतेच्या पंपाची व्यवस्था केली जाते. पण हे पंप बसवूनही समुद्राच्या भरतीच्या वेळेस पाऊस जास्त पडला तर तर अनेकदा नायर रुग्णालय, डॉ.आनंदराव नायर मार्ग, मोरलँड मार्ग, एम.ए.रोड, मराठा मंदिर जंक्शन येथे १ ते २ फूट पाणी साचते. मागील वर्षी याठिकाणी साचलेल्या पाण्याचा सात ते आठ तास निचरा झाला नव्हता.
त्यामुळे महापालिकेच्या पर्जन्य जलवाहिनी विभागाच्यावतीने याठिकाणी मिनी पंपिंग स्टेशनसह १२०० मि.मी व्यासाच्या दोन रायझिंग मेन वाहिन्या टाकण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार महापालिकेच्यावतने कंत्राटदाराची निवड करण्यात आली आहे. यासाठी सुमारे ३३ कोटी रुपये खर्च करण्यात येणार असून या कामासाठी मिशिगन इंजिनियर्स प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी पात्र ठरली आहे.
हे काम ९ महिन्यांमध्ये पूर्ण करणे अपेक्षित
यामध्ये महालक्ष्मी रेल्वे स्थानकाच्या परिसरामध्ये पंप बसवण्यासाठी ऍक्सेस शाफ्ट व सम पीट बांधून १२०० मि.मी व्यासाच्या दोन रायझिंग वाहिन्या टाकून सम्प पीट मध्ये जमा होणारे पाणी ३ हजार घन मीटर प्रती तास क्षमतेच्या ८ पंपाद्वारे उपसा करून ते पाणी १२०० मि.मी व्यासाच्या व २२५ मीटर लांबीच्या दोन रायझिंग मेन वाहिन्यातून डॉ ई.मोझेस मार्गावरील भूमिगत जलवाहिनीपर्यंत वाहून नेण्याची व्यवस्था केली जाणार आहे. यासाठी ८ पंप भाडेतत्वावर घेण्यात येणार आहे. ही कामे झाल्यानंतर नायर रुग्णालय, डॉ.आनंदराव नायर मार्ग, मोरलँड मार्ग, एम.ए. रोड, मराठा मंदिर रोड जंक्शन येथे पावसाळ्यात उद्भभवणारी पूर परिस्थिती नियंत्रणात येईल,असा विश्वास पर्जन्य जलवाहिनी विभागाचे प्रमुख एल.कमलापूरकर यांनी व्यक्त केला. हे काम पावसाळ्यासह पुढील ९ महिन्यांमध्ये पूर्ण करणे अपेक्षित असल्याचेही त्यांनी स्प्ष्ट केले आहे.
Join Our WhatsApp Community