लहान मुले चोरी करणाऱ्या टोळ्या मुंबईत कार्यरत असून, या टोळ्या फुटपाथवर झोपणारे, झोपडपट्टीत राहणाऱ्या वर्षाच्या आतील मुलांची चोरी करुन त्याची विक्री परराज्यात करत असल्याचा प्रकार नुकताच उघडकीस आला आहे. वांद्रे पोलिसांनी नुकताच अशाच एका टोळीचा छडा लाऊन मुंबई आणि तेलंगणा येथून चार जणांना अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या टोळीत एका महिलेचा समावेश असून या टोळीकडून पोलिसांनी वांद्रे येथून चोरलेले १० महिन्यांचे मूल ताब्यात घेतले आहे.
चौघे जण ताब्यात
फरजाना कुर्बान शेख(३३), परंदाम गुंडेती(५०), नक्का नरसिंहा (३५) आणि विशिरी कापल्या धर्माराव (५०) असे अटक करण्यात आलेल्या टोळीतील चौघांची नावे आहेत. फरजाना आणि परंदाम हे दोघे मुंबईतील खारदांडा परिसरात राहत असून, विशिरी कापल्या धर्मराव आणि नक्का नरसिंहा हे दोघे तेलंगणा राज्यातील आहेत. वांद्रे पश्चिम, माहीम कॉजवे येथील वाहतूक पोलिस चौकीजवळ असणाऱ्या उड्डाणपुलाखाली राहणाऱ्या एका कुटुंबातील १० महिन्यांचा मुलगा कैफ १ सप्टेंबर रोजी मध्यरात्री आईच्या कुशीतून अचानक गायब झाला होता. याप्रकरणी वांद्रे पोलिस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
(हेही वाचाः वाझेने का ठेवली अंबानींच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेली गाडी? हे आहे कारण)
असा लावला छडा
वांद्रे पोलिसांनी या मुलाच्या शोधासाठी परिसरातील सीसीटीव्ही, तसेच अनेकांकडे चौकशी केल्यानंतर फरजानाचे नाव पुढे आले. वांद्रे पोलिसांनी फरजाना हीचा शोध घेऊन तिला खारदांडा येथून ताब्यात घेण्यात आले. तिच्याकडे चौकशी केली असता ते मूल तिनेच चोरल्याची कबुली दिली व ते मूल परंदाम गुंडेती याला दीड लाखात विकल्याचे तिने सांगितले. पोलिसांनी परंदाम गुंडेती याला देखील खारदांडा येथून अटक करुन त्याच्यकडे चौकशी केली असता, त्याने ते मूल तेलंगणा येथील नातेवाईक नक्का याला दिले. मोबदल्यात त्याने तीन लाख रुपये दिले होते अशी माहिती त्याने दिली. पोलिसांनी त्याच दिवशी तेलंगणा गाठले आणि नक्का आणि विशिरी कापल्या या दोघांना अटक करुन त्याच्या ताब्यात असलेले १० महिन्यांचे मूल ताब्यात घेऊन मुंबईकडे रवाना झाले.
तीन लाखांत खरेदी
अधिक चौकशीत आलेल्या माहितीनुसार, विशिरी कापल्या वीज कंपनीत अधिकारी पदावर नोकरीला आहे. विशिरी कापल्या याला मुलंबाळं नसल्यामुळे नक्का याने मुंबईतील नातेवाईकाकडून मूल आणून देण्याची हमी घेतली आणि १० महिन्यांच्या कैफची तीन लाखांत खरेदी केली होती अशी माहिती समोर आली.
(हेही वाचाः तुमच्या खिशातून मोबाईल होऊ शकतो चोरी! कसा तो वाचा?)
Join Our WhatsApp Community