मुंबईसह संपूर्ण देशात बॉम्बस्फोट करून हाहाकार माजवून देईल, असे एकामागून एक धमकीचे फोन येत होते. मात्र हे फोन नेमके कोणाचे, याचा तपास मुंबई गुन्हे शाखेकडून सुरू होता. या धमकीच्या फोनने संपूर्ण मुंबई पोलीस दलाची झोप उडवली होती. मात्र अशाप्रकारे धमकी देणाऱ्या तरूणाला पोलिसांनी ताब्यात घेऊन अटक केली आहे.
(हेही वाचा – Indian Railway: रेल्वेचे आरक्षण करताय, तर आता या; प्रवाशांना मिळणार विंडो सीट, काय आहे रेल्वेचा नियम?)
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई गुन्हे शाखेच्या युनिट ९ ने अटक केली आहे. धमकी देणाऱ्या आरोपीचे नाव रणजीत कुमार सहानी असे असून त्याचे वय २५ वर्ष आहे. हा आरोपी मूळचा बिहारचा रहिवासी असून त्याने व्हॉट्सअप व्हिडिओ कॉल करून बॉम्बस्फोटाची धमकी दिली होती. गुन्हे शाखेने तपास केल्याप्रमाणे सहानीने हैद्राबादमधून कॉल केल्याचे सांगण्यात येत आहे. कॉल केल्यानंतर तो ट्रेनमध्ये चढला आणि मुंबईच्या दिशेने निघाला. सहानी मुंबईत पोहोचताच त्याचा शोध घेण्याचे करण्याचे मुंबई गुन्हे शाखेने सुरू केले होते. अखेर मोबाईल लोकेशनच्या मदतीने सहानीला दक्षिण मुंबईतील चर्नीरोड परिसरातून अटक करण्यात आली आहे.
सहानीने सांताक्रूझ येथे राहणाऱ्या रफत हुसेन नावाच्या व्यक्तीला व्हॉट्सअॅपवर व्हिडिओ कॉल केला आणि त्याला बॉम्बस्फोट करना है इंडिया में विनाश है, असे सांगितले. या फोन कॉलनंतर फोन आलेल्या व्यक्तीने मुंबई पोलिसांना याची माहिती दिली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी तक्रार घेऊन व्हॉट्सअॅपवर व्हिडिओ कॉल करणाऱ्या अज्ञात व्यक्तीविरूद्ध भादंवि कलम ५०६ (२) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास मुंबई गुन्हे शाखा करत आहे.