गेल्या काही दिवसांपासून मुंबई गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थविरोधी पथकाच्या कारवाया सुरू आहे. नुकतीच मुंबई गुन्हे शाखा पथक ६ ने एक कारवाई केली आहे. मुंबईतील दहिसर चेक नाका येथून २४ किलो चरस मुंबई गुन्हे शाखा विभागाने जप्त केले आहे. इतकेच नाही तर या २४ किलो चरससह चार जणांना देखील अटक करण्यात आली आहे.
मुंबई गुन्हे शाखा पथक ६ ची कारवाई
मिळालेल्या माहितीनुसार, हे ड्रग्ज राजस्थानहून मुंबईत रस्त्याच्या मार्गे आणले जात होते. जप्त करण्यात आलेल्या ड्रग्जची किंमत १ कोटी ४४ लाख रुपये आहे. मुंबई गुन्हे शाखा पथक ६ ने केलेल्या कारवाईत अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये २ पुरुष आणि २ महिलांचा समावेश आहे. हे सर्व आरोपी पवई येथील रहिवासी असल्याचे सांगितले जात आहे. मुंबई गुन्हे शाखेचे पथक एक महिन्यापासून मुंबईच्या प्रवेशद्वाराजवळ सापळा रचून होते. यादरम्यान हे पथक अंमली पदार्थ तस्करांची वाट पाहत होते. यासंदर्भात गुन्हे शाखेचे डीसीपी दत्ता नलावडे मंगळवारी पत्रकार परिषदही घेणार आहेत.
(हेही वाचा- महालक्ष्मी जवळील रेल्वे उड्डाणपुलाचा मार्ग मोकळा, महापालिकेने केली अशी कारवाई)
गेल्या आठवड्यातही झाली कारवाई
गेल्या आठवड्यात मुंबई गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थविरोधी कक्षाने या आठवड्याच्या सुरुवातीला मध्य प्रदेशातील शामगढ येथून एका औषध उत्पादकाला शोधून अटक केले होते. आरोपीने मुंबईतील ड्रग पेडलरला औषधे तयार केली आणि पुरवली असल्याचे सांगितले गेले. ज्याला एएनसीने जूनमध्ये कोट्यवधी किंमतीच्या औषधांसह अटक देखील केली होती.
Join Our WhatsApp Community