मुंबई गुन्हे शाखेच्या गुप्तवार्ता युनिटने मध्यप्रदेश राज्यातील धार जिल्ह्यातील एका आश्रमातून एकाला अटक केली आहे. त्याच्याकडून भारतीय चलनातील २१ लाख रुपयांच्या बनावट नोटा जप्त केल्या आहेत. स्थानिक पोलिसांच्या मदतीने ही कारवाई करण्यात आली असून या आश्रमातून बनावट नोटा देशभरात वितरित करण्यात येत असल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे.
नेमका काय आहे प्रकार
देवदास अटवाल (४५) असे मध्यप्रदेशच्या आश्रमातून अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे. या आश्रमात पूजा करण्यात येत होती, या आश्रमाला तसेच बनावट नोटा तयार करण्यासाठी वित्तपुरवठा करणार मुख्य व्यक्ती फरार असून त्याच्या अटकेनंतर या बनावट नोटांचे राज उघडकीस येईल, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली. मुंबई गुन्हे गुप्तवार्ता युनिटच्या अधिकाऱ्यानी १५ मे रोजी मोहम्मद अर्शद मोहम्मद सिद्दीकी (४२) याला छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे टर्मिनस जवळ अटक केली होती. त्याच्या अंगझडतीत २ हजाराच्या ५ लाख रुपयांच्या बनावट नोटा मिळून आल्या होत्या. चौकशीत सिद्दिकीने आणखी एका आरोपीचे नाव उघड केले, लवेश सीताराम तांबे (४१), जो रेल्वे स्थानकाजवळ बनावट नोटा घेण्यासाठी येणार होता, अशी माहिती पोलीस उपायुक्त बालसिंग राजपूत यांनी दिली.
(हेही वाचा – Amarnath Yatra 2022: ‘या’ कारणामुळे अमरनाथ यात्रा तुर्तास स्थगित)
अटक करण्यात आलेला सिद्दीकी हा मूळचा उत्तर प्रदेशातील वाराणसीचा असून तांबे हा ठाण्यातील कळव्याचा रहिवासी आहे. या दोघांकडे करण्यात आलेल्या चौकशीत तांबे याने तिसरा आरोपी प्रदीप नारायणकर याचे नाव पुढे केले, तांबे हा नारायणकर यांच्या बनावट नोटा देणार होता. सीआययुने नारायणकरला २२ मे रोजी अटक केली, त्याच्या चौकशीत पोलिसांना मध्यप्रदेश येथील आश्रमाची माहिती मिळाली. सीआययुचे एक पथक मध्यप्रदेश राज्यातील धार जिल्ह्यात दाखल झाले, मात्र हा आश्रम जंगलातील आदिवासी पाड्यात असल्यामुळे त्या ठिकाणी जाऊन छापा टाकणे अवघड असल्यामुळे स्थानिक पोलिसांच्या मदतीने सीआययुच्या पथकाने आश्रमात छापा टाकून देवदास अटवाल याला अटक केली.
आश्रमाच्या झडतीत पोलिसांना २१ लाख रुपयाच्या बनावट नोटा मिळाल्या. पोलिसांनी या नोटा ताब्यात घेऊन अटवाल याला अटक करून मुंबईत आणले. आश्रमातून जप्त केलेल्या बनावट नोटा उच्च दर्जाच्या असून त्यांची छपाई कुठे करण्यात आली तसेच देशात कुठल्या राज्यामध्ये या नोटा वितरित करण्यात आलेल्या आहेत, याबाबत तपास सुरू असल्याची माहिती पोलीसानी दिली आहे.
Join Our WhatsApp Community