कुणाच्या आशीर्वादाने सुरू आहे फेरीवाल्यांकडून हप्ता वसुली?

123

मुंबईतील फुटपाथवर व्यवसाय करणाऱ्या फेरीवाल्याकडून प्रोटेक्शन मनीच्या नावाखाली हप्ता वसुली करण्यात येत आहे. ही वसुली नक्की कुणाच्या आशीर्वादामुळे सुरू आहे, यामागे नक्की कोण आहे याचा शोध मुंबई गुन्हे शाखा घेणार आहे. खंडणी विरोधी पथकाने नुकतीच दादर, शिवाजी पार्क आणि क्रॉफर्ड मार्केट येथील लोहार चाळ या ठिकाणी फेरीवाल्याकडून बेकायदेशीररित्या दररोज हप्ता वसुली करणाऱ्या तिघांना अटक केली आहे. पोलीस सूत्रांच्या म्हणण्यानुसार, अटक करण्यात आलेले केवळ पैसे गोळा करण्याचे काम करतात मात्र यामागे भलतेच कोण तरी मोठी व्यक्ती अथवा सरकारी यंत्रणेतील बड्या अधिकाऱ्याच्या आशीर्वादाने ही वसुली सुरू आहे.

(हेही वाचा – स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत ‘मविआ’ एकत्र लढणार! काय म्हणाले पवार?)

मात्र बोलविता धनी मोकाट

मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे यांच्या आदेशानंतर स्थानिक पोलीस ठाण्याला हप्ता वसुली कारणाऱ्यावर कारवाईचे काम न देता गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाकडे ही जबाबदारी सोपविण्यात आली आहे. मुंबईतील कुठल्याही विभागातून तक्रार आल्यावर तात्काळ गुन्हे दाखल करून वसुली कारणाऱ्यावर कारवाईचे आदेश देण्यात आले आहे. खंडणी विरोधी पथकाने केवळ शिवाजी पार्क, दादर आणि लोहार चाळ येथून तिघांना अटक केली आहे, मात्र यांचा बोलविता धनी मोकाट असून त्याच्यापर्यंत पोलीस यंत्रणा पोहचू शकलेली नाही. दादर शिवाजी पार्क येथून अटक करण्यात आलेले दोघे जमाल शेख याच्या सांगण्यावरून वसुली करीत होते, अशी माहिती त्यांनी खंडणी विरोधी पथकाला दिली आहे. मात्र या जमाल शेख भूमिगत झाल्यामुळे तो पोलिसांच्या हाती लागलेला नाही. जमाल शेख हा गुंड प्रवृत्तीचा त्याने फेरीवाल्याकडून केलेली बेकायदेशीर वसुलीचा हिस्सा संबंधित सरकारी यंत्रणेतील अधिकारी यांना पाठविला जातो. जमाल शेखला अटक झाल्यावर अनेकांची पोलखोल होऊ शकते, अशी माहिती एका अधिकारी यांनी दिली आहे.

कारवाईच्या नावाने तू तू मै मै 

बेकायदेशीररित्या फुटपाथ अडवून धंदा करणाऱ्या फेरीवाल्यावर कारवाई करण्यासाठी पोलीस यंत्रणा आणि महानगर पालिका अधिकारी यांच्यात नेहमी तू तू मै मै होत असल्याचे ऐकायला मिळत आहे. फेरीवाल्यावर कारवाई करण्याबाबत पोलिसाकडे चौकशी केली असता पोलीस महानगर पालिकेकडे हात दाखवत आम्ही केवळ फेरीवाल्याना हटविण्यासाठी बंदोबस्त देऊ शकतो, फेरीवाल्यावर कारवाई करण्याचे काम मनपाचे असल्याचे सांगितले जाते. मनपा अधिकारी पोलिसांवर बोट ठेवून आम्ही कारवाई केल्यानंतर त्या ठिकाणी फेरीवाला बसणार नाही, याची काळजी पोलिसांनी घेतली पाहिजे किंवा कारवाई करतांना पोलिसाकडे पोलीस बंदोबस्त मागितला असता मनुष्यबळ कमी असल्याचचे सबब पुढे करण्यात येतात, असा आरोप एका मनपा अधिकारी यांनी केला आहे.

वसुली मात्र दोन्ही यंत्रणेसाठी

बेकायदेशीर फेरीवाल्यावर कारवाई करतांना एकमेकांवर बोट दाखवणाऱ्या या दोन्ही सरकारी यंत्रणा वसुलीतील हिस्सा घेण्यासाठी सदैव पुढे असतात. वसुली गॅंगकडून दररोज गोळा करण्यात आलेली रक्कमेतील काही हिस्सा दोन्ही यंत्रणेला पुरविला जात असल्याची माहिती काही फेरीवालयांनी दिली आहे.

वसुली गॅंगला एरिया वाटप

मुंबईतील फेरीवाल्यांकडून दररोजची वसुली करण्यासाठी विविध वसुली गॅंग काम करीत आहे, या गॅंगला एरिया वाटप करून दिलेले आहेत. दादर शिवाजी पार्क पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोठ्या प्रमाणात असलेल्या फेरीवाल्याकडून वसुली करण्यासाठी दहा ते बारा गॅंग काम करतात. या गँगला फेरीवाला क्षेत्र वाटून दिलेले असून या गॅंग त्यांच्या क्षेत्रातून वसुली करतात. एक गॅंग सुमारे दिवसाला एक लाख रुपयांच्या पुढे वसुली करते, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.