मुंबई पोलीस दलातील पोलीस उपायुक्त त्रिपाठींचं होणार निलंबन?

मुंबई पोलिसांनी त्रिपाठी यांच्या निलंबनाचा प्रस्ताव राज्याच्या गृहविभागाकडे

150

मुंबई पोलीस दलातील पोलीस उपायुक्त सौरभ त्रिपाठी यांना खंडणी प्रकरणात आरोपी घोषित करण्यात आले आहे. दरम्यान मुंबई पोलिसांनी त्रिपाठी यांच्या निलंबनाचा प्रस्ताव राज्याच्या गृहविभागाकडे पाठविण्यात आलेला आहे. सौरभ त्रिपाठी हे आयपीएस अधिकारी असून मुंबईतील परिमंडळ २ चे उपायुक्त होते, गुन्हा दाखल झाल्यापासून त्रिपाठी हे अचानक रजेवर निघून गेले आहे.

काय आहे प्रकरण?

काळबादेवी परिसरात अंगाडीया कुरिअर सर्व्हिस चालविणाऱ्या व्यापाऱ्या कडून खंडणी वसूल केल्याप्रकरणी मागील महिन्यामध्ये लोकमान्य टिळक मार्ग पोलीस ठाण्यात तीन पोलीस अधिकारी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. हे तिघेही लोकमान्य टिळक मार्ग पोलीस ठाण्यातील अधिकारी असून दोघांना मागच्या महिन्यात अटक करण्यात आली होती, तर गेल्या आठवड्यात पोलीस निरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्याला अटक करण्यात आली आहे.

या खंडणी प्रकरणात परिमंडळ २ चे पोलीस उपायुक्त सौरभ त्रिपाठी यांचे देखील नाव येत होते मात्र पुरावे नसल्याकारणाने त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता. खंडणीचा गुन्हा दाखल होताच पोलीस उपायुक्त हे रजेवर निघून गेले होते. दरम्यान अंगाडीया यांनी अप्पर पोलीस आयुक्त यांना दिलेल्या लेखी तक्रारीत त्यांनी स्पष्टपणे पोलीस उपायुक्त यांच्या नावाचा उल्लेख केला होता, त्रिपाठी यांनी दहा लाख रुपयामागे १लाख तर ५ लाखामागे ५० हजार प्रत्येकी द्यावे लागतील अशी मागणी अंगाडीया असोसिएशनच्या अध्यक्षाकडे केली होती अन्यथा कारवाईला सामोरे जावे लागेल अशी धमकी वजा सूचना दिल्याचे लेखी तक्रारीत म्हटले होते. दरम्यान या गुन्ह्याच्या तपासात त्रिपाठी यांचा सहभाग समोर येताच त्रिपाठी यांना देखील या गुन्ह्यात पाहिजे आरोपी घोषित करण्यात आले आहे.

(हेही वाचा –किशोरवयीन मुलांच्या लसीकरणाचा पहिलाच दिवस गोंधळाचा! पण कारण काय?)

पोलीस उपायुक्त सौरभ त्रिपाठी यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात यावी असा प्रस्ताव मुंबई पोलिसांकडून गृहविभागाला पाठविण्यात आलेला आहे, प्रस्तावात असे म्हटले आहे की, प्राथमिक चौकशी सुरू असताना त्रिपाठी यांनी मूळ तक्रारदारांवर तक्रार मागे घेण्यासाठी प्रभाव टाकण्याचा प्रयत्न करून केला होता, मूळ तक्रारदाराने या संदर्भातील काही कॉल रेकॉर्डिंग वरिष्ठ अधिकारी यांच्याकडे सुपूर्द केले आहे.

पोलीस उपायुक्त सौरभ त्रिपाठी यांच्याबद्दल…

पोलीस उपायुक्त सौरभ त्रिपाठी हे २०१० बॅचचे आयपीएस अधिकारी आहे, त्रिपाठी यांनी अहमदनगरचे पोलीस अधीक्षक म्हणून काम पाहिलेल आहे. अण्णा हजारे यांच्या आंदोलनावेळी त्यांनी बंदोबस्तासाठी चांगलं काम केले होते, त्यानंतर त्यांची मुंबईत बदली करण्यात आली. मुंबई वाहतूक विभागात पोलीस उपायुक्त म्हणून त्यांनी काम बघितले. तेथून त्यांची परिमंडळ ४ चे पोलीस उपायुक्त म्हणून त्यांची नेमणूक करण्यात आली.त्रिपाठी यांनी प्रोटेक्शन सिक्युरिटी विभागात म्हणून काम पाहिलंय,त्यानंतर त्यांची नियुक्ती परिमंडळ२ मध्ये पोलीस उपायुक्त म्हणून करण्यात आली होती जिथे त्यांच्यावर खंडणीचे आरोप झाले, या आरोपानंतर त्यांची बदली पोलीस उपायुक्त अभियान या ठिकाणी करण्यात आली पण त्यांनी अद्याप चार्ज घेतला नाही.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.