फिल्मसिटीमध्ये ‘हेरॉईन’ची डिलेव्हरी; एकाला अटक

मुंबई – दिंडोशी पोलिसांनी एक कोटी रुपये किंमतीचे ‘हेरॉईन’सह एकाला गोरेगाव पूर्व फिल्मसिटीच्या दिशेने जात असताना अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्या व्यक्तीकडून पोलिसांनी २७० ग्रॅम हेरॉईन हे अमली पदार्थ जप्त केले आहे. जप्त करण्यात आलेल्या हेरॉईनचा पुरवठा फिल्मसिटीमध्ये करण्यात येणार होता,  असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
दिंडोशी पोलीस ठाण्याकडून गोरेगाव पूर्व तसेच हद्दीत अमली पदार्थ विरोधी मोहीम राबविण्यात येत असताना, एक इसम गोरेगाव फिल्मसिटी मार्गावर मोठया प्रमाणात अमली पदार्थांची डिलेव्हरी करण्यासाठी येणार असल्याची माहिती दिंडोशी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जीवन खरात यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे दिंडोशी पोलिसांनी परिसरात सापळा रचला असता सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास एक संशयित व्यक्ती पोलिसांना बघून मोटारसायकल घाईघाईने सुरू करून पळून जाण्याचा प्रयत्न करीत असताना पोलिसांनी त्याला थांबवले.
दरम्यान पोलिसांनी त्याच्या जवळील बॅग तपासली असता बॅगेत एक पाकीट आढळले. पाकीट तपासण्यात आले असता त्यात हेरॉईन हा अमली पदार्थ पोलिसांना सापडला. याप्रकरणी पोलिसांनी या व्यक्तिविरुद्ध अमली पदार्थ विरोधी कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. त्याच्याकडे कसून चौकशी केली असता तो अमली पदार्थ घेऊन फिल्मसिटीच्या दिशेने निघाला होता व त्या ठिकाणी एक इसम त्याला भेटून त्याच्याकडून अमली पदार्थाचे पाकीट घेणार होता अशी माहिती समोर आली.
दिंडोशी पोलिसांनी अटक करण्यात आलेल्या आरोपीकडून जप्त करण्यात आलेल्या हेरॉईनचे वजन २७० ग्रॅम असून आंतरराष्ट्रीय बाजरात त्याची किंमत एक कोटीच्या जवळपास असल्याची माहिती वपोनी खरात यांनी दिली. याप्रकरणी अधिक तपास सुरू असून तो हे अमली पदार्थ कुणाला देणार होता? याबाबत चौकशी सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here