क्रूझवरील एनसीबीच्या कारवाईत पंचाच्या भूमिकेत राहणारा आणि त्यावेळी किंग खानचा मुलगा आर्यन खानसोबत सेल्फी काढून तो फोटो सोशल मीडियात व्हायरल करणारा के.पी. गोसावी याला पुणे पोलिसांनी अखेर गुरुवारी, २८ ऑक्टोबर रोजी अटक केली. त्याआधी गोसावी याने त्याचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल केला. त्यामध्ये त्याने त्याच्यावरील फसवणुकीचे आरोप फेटाळून लावले. तसेच आपण मराठी आहोत. त्यामुळे आपल्या मागे सत्ताधारी किंवा विरोधकांमधील कुणीतरी एकाने पाठिशी राहावे आणि आपण सांगत असलेल्या गोष्टींचा पाठपुरावा करावा, असे आवाहन केले.
काय म्हटले आहे गोसावीने?
मी प्रभाकर साईलविषयी काही बोलू इच्छितो. सॅम डिसूझासोबत कोणाचे संभाषण झाले? किती पैसे कोणी घेतले? प्रभाकर साईलला गेल्या पाच दिवसांत काय ऑफर आल्या आहेत? हे त्याच्या मोबाइलमधून स्पष्टपणे समजेल. प्रभाकर साईल आणि त्याच्या दोन्ही भावांचे सीडीआर रिपोर्ट आणि मोबाइल संभाषण काढावे. मी प्रभाकरसोबत इथून तिथून पैसे आणण्यासोबत बोललो असेन तर माझे मोबाइल चॅट्स काढा. माझा इम्पोर्ट-एक्स्पोर्टचा व्यवसाय आहे. त्यामध्ये पूर्वीच्या काही चॅट्स असतील ज्यामध्ये व्यवसायातील पैशांची देवाण-घेवाण याबद्दल चर्चा असायची तिथे मी त्याला पाठवायचो. पण २ तारखेनंतरचे याचे चॅट्स पाहावेत आणि डिलीट केलेले मेसेजही काढावेत एवढी विनंती आहे. मुंबई पोलिसांनी केस हाती घेतली, तर सर्वात प्रथम याची माहिती काढावी. मंत्री वैगैरे जेवढे याच्या मागे आहेत त्या सर्वांची माहिती काढावी. मी मराठी असल्याने माझ्या मागे कोणीतरी उभे राहावे. सत्तेतील असोत किंवा विरोधातील…एकाने तरी माझ्या पाठी उभे राहून मी सांगत आहे तितक्या गोष्टींसाठी मुंबई पोलिसांकडे विनंती करावी. प्रभाकर साईलचे फोन रेकॉर्ड काढा, सगळ्या गोष्टी स्पष्ट होतील, जे आरोप करत आहे ते सर्व खोटे आहेत. यांनीच पैसे घेतले असून हा आणि त्याचे दोन भाऊ यात सहभागी आहेत.
(हेही वाचा : अखेर के.पी. गोसावीला अटक! कोणत्या गुन्ह्याखाली घेतले ताब्यात?)
आणखी खुलासे होणार!
आर्यन खान प्रकरणावरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यावर अनेक आरोप केले आहेत. यामुळे राज्यात सध्या खळबळ उडाली असून समीर वानखेडेंच्या कुटुंबियांकडूनही स्पष्टीकरण दिले जात आहे. दुसरीकडे एनसीबीचा साक्षीदार प्रभारक साईलने जबाब पालटला असून समीर वानखेडेंवर आरोप केले असून यात किरण गोसावीचाही समावेश आहे. प्रभाकर साईल हा किरण गोसावीचा अंगरक्षक होता. किरण गोसावीला ताब्यात घेतल्यामुळे आर्यन खान प्रकरणी आणखी मोठे खुलासे होण्याची शक्यता आहे.
Join Our WhatsApp Community