मुंबईत पहिल्यांदाच दर्शन झालेल्या लॉगर हेडेड कासवाच्या तब्येतीबाबत मोठी बातमी हाती आली आहे. 17 ऑगस्ट मढ येथील समुद्रकिनाऱ्यावर आलेल्या लॉगर हेडेड कासवाला तातडीने वनाधिकाऱ्यांनी ऐरोली येथील सागरी वन्यजीव उपचार केंद्रात उपचारासाठी आणले गेले. अखेर दीड महिन्याहून अधिक काळ उपचार घेतल्यानंतर वनाधिकाऱ्यांनी गुरूवारी नैसर्गिक अधिवासात मुक्त केले. लॉगर हेडेड कासवाला समुद्रात सोडण्यापूर्वी तिच्या पंखाना टॅग केले गेले.
(हेही वाचा – दसऱ्याच्या दिवशी आधी कुणाचे भाषण ऐकायचे? अजित पवार म्हणतात उद्धव ठाकरेंचे…)
तपासणीदरम्यान, ही पूर्ण वाढ झालेली मादी कासव असून तिला न्यूमोनिया झाल्याचे निष्पन्न झाले. कासावाच्या पाठीच्या कवचालाही जखमा होत्या. सुरुवातीला वनाधिकाऱ्यांनी भरवलेले अन्न कासावाने उलटी करुन बाहेर काढले. कासवाला सलाईनही दिली गेली.
मानसिक तणावाखाली असलेल्या कासावाने काही दिवसांनी स्वतःहून खायला सुरुवात केली. फुफ्फुसातील संसर्ग कमी झाल्यानंतर कासवाला कितपत स्वतःहून पुन्हा पाण्यात पोहता येते, याची तपासणी केली गेली. त्यानंतरच कासवाला पुन्हा समुद्रात सोडण्याचा निर्णय घेतला गेला. अखेरीस गुरूवारी मादी कासवाला समुद्रात मुक्त संचारासाठी वनाधिकाऱ्यांनी सोडले. यावेळी वनाधिकाऱ्यांसह प्राणीप्रेमी संस्थाचे कार्यकर्तेही उपस्थित होते.