गेल्या काही तासांपासून रत्नागिरीतील काही भागात मुसळधार पावसाने चांगलेच झोपडून काढल्याचे पाहायला मिळत आहे. अशातच मुंबई-गोवा महामार्गावरील परशुराम घाटात शनिवारी रात्री अकराच्या सुमारास दरड कोसळली. दरड कोसळल्याने या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. पुन्हा एकदा परशुराम घाटात दरड कोसळण्याचे सत्र सुरूच आहे. सोमवारी संध्याकाळी ४ वाजता बंद करण्यात आलेली वाहतूक अद्याप बंदच असल्याचे समोर येत आहे. त्यामुळे परशुराम घाटात वाहनाच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.
(हेही वाचा – मुंबईत मुसळधार पाऊस, जनजीवन विस्कळीत; कोणत्या भागात काय परिस्थिती?)
मिळालेल्या माहितीनुसार, आज, मंगळवारी परशुराम घाटाची पाहणी करून वाहतुकीचा निर्णय घेण्यात येणार आहे. रत्नागिरी जिल्ह्यात तब्बल २० तास उलटून गेल्यानंतर ही पावसाचा जोर कायम आहे. त्यामुळे सतत वाहनांची वर्दळ असणारा हा मुंबई-गोवा महामार्गावर दरडी कोसळत असल्याचे पाहायला मिळत आहे. घाटात कोणताही गैरप्रकार घडू नये म्हणून सुरक्षेसाठी परशुराम घाट अद्याप बंद ठेवण्यात आला आहे. तर मुंबई-गोवा महामार्गावर कोसळलेल्या दरडी हटवण्याचे काम सुरू युद्धपातळीवर सुरू असल्याचे सांगितले जात आहे.
दोन दिवसांपूर्वी हा घाट मध्यरात्री दरड कोसळल्याने वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. सध्या हलक्या वजनाची वाहतूक कळंबस्ते- आंबडस- लोटे मार्गे वळविण्यात आली आहे. तर, मुंबई-गोवा महामार्गावरील परशुराम घाटातील दोन्ही बाजूकडील वाहने शनिवारी रात्री एक वाजण्याच्या सुमारास सोडण्यात आली होती. त्यावेळी परशुराम घाटातील वाहतूकीचा मार्ग बदलण्यात आला असून चिरणी मार्गे वळवण्यात आला होता. दरड कोसळल्याने मुंबई गोवा महामार्गावरील वाहतूकीस मोठा अडथळा निर्माण झाल्याने महामार्गावरील वाहतूक थांबवण्यात आली असून चिरणी-आंबडस या पर्यायी मार्गे वळवल्याने वाहतूक सुरू होती. मात्र आज मंगळवारी ती ठप्प असल्याचे सांगितले जात आहे.
Join Our WhatsApp Community