बोगस कागदपत्रांच्या आधारे आधारकार्ड आणि पॅनकार्ड बनवणाऱ्या टोळीतील एका आरोपीला मुंबई गोरेगाव पोलिसांनी अटक केली आहे. मुंबईतील गोरेगाव परिसरातील नागरिक सुविधा केंद्रावर छापा टाकून पोलिसांनी 30 हून अधिक बनावट आधार कार्ड आणि 15 बनावट पॅन कार्ड जप्त केले आहेत. या प्रकरणी पोलिसांनी बनावट आधार कार्ड आणि पॅनकार्ड बनवणाऱ्याला अटक केली आहे. पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.
कोणत्याही कागदपत्रांशिवाय आधार कार्ड बनवण्याचे काम अटक करण्यात आलेल्या आरोपीकडून केले जात होते. या प्रकरणात आणखी काही आरोपी असल्याचा पोलिसांना संशय आहे. गोरेगावचे वरिष्ठ पीआय दत्तात्रय थोपटे यांच्या मार्गदर्शनाखाली एटीएसचे पथक सातत्याने तपास करत होते. या तपासादरम्यान, गोरेगाव परिसरात एक व्यक्ती कोणत्याही कागदपत्रांशिवाय अकराशे रूपयांना आधारकार्ड आणि पॅनकार्ड देत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
(हेही वाचा – पुण्यात बनावट नोटांचा ‘खेळ’! ६ महिन्यांपासून सुरू होती नोटांची छपाई अन्…)
उत्तर मुंबईचे अतिरिक्त पोलीस आयुक्त वीरेंद्र मिश्रा यांच्या आदेशाने सर्व पोलीस ठाण्यांना बांगलादेशी आणि नायजेरियन नागरिकांवर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या आदेशानंतर पोलिसांनी डमी ग्राहक बनवून त्याला गोरेगावच्या प्रेम नगर येथील आरोपी श्याम नारायण मिश्रा यांच्या सार्वजनिक सेवा केंद्रात पाठवले. तेथे श्याम मिश्राने त्या ग्राहकाकडून ११०० रूपयांमध्ये आधारकार्ड बनवण्याचे आश्वासन दिले. यावेळी मिश्राने कोणत्याही कागदपत्रांशिवाय ग्राहकाचे आधारकार्ड बनवले असता गोरेगाव पोलिसांच्या तपास पथकाने सापळा रचून आरोपी मिश्रा यांच्या केंद्रावर छापा टाकला आणि त्याला बेड्या ठोकल्या.
Join Our WhatsApp Community