वरिष्ठ आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांनी एफआयआर रद्द करण्याची मागणी करत मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा भाजप नेतृत्वाच्या कार्यकाळात बेकायदेशीरपणे टेलिफोन टॅपिंग केल्याप्रकरणी पुणे शहर बंडगार्डन पोलीस ठाण्यात रश्मी शुक्ला यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान रश्मी शुक्ला यांनी राजकीय सूडबुद्धीनं गुन्हा दाखल करण्यात आल्याचा आरोप केला आहे. उच्च न्यायालयाने २५ मार्चपर्यंत कोणतीही कठोर कारवाई न करण्याचे पुणे पोलिसांना निर्देश देण्यात आले आहेत.
( हेही वाचा : दहशतवाद विरोधी पथक कोणाच्या दहशतीखाली? वाचा पोलीस दलातील धक्कादायक परिस्थिती…)
कठोर कारवाई न करण्याचे आदेश
रश्मी शुक्ला यांनी वकील समीर नांगरे यांच्यामार्फत उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. तीन वर्षांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिवाय या प्रकरणात अन्य अधिकारीही सहभागी असताना केवळ शुक्ला यांच्यावरच गुन्हा दाखल करण्यात आल्याचे मत न्यायालयाने नोंदवत रश्मी शुक्ला यांना दिलासा दिला आहे. यानंतर न्यायालयाने रश्मी शुक्ला यांच्यावर अटकेसारखी कठोर कारवाई न करण्याचे आदेश दिले आहेत.
फोन टॅप केल्याचा आरोप
गेल्या वर्षी पटोले यांनी आरोप केला होता की 2016-2017 दरम्यान आपला फोन अमली पदार्थांच्या तस्करीत गुंतलेल्या अमजद खानचा असल्याचे सांगून टॅप करण्यात आला होता. केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचे सहाय्यक, तत्कालीन भाजप खासदार संजय काकडे आणि इतर निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींचे फोन टॅप करण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला होता.
रश्मी शुक्ला या सध्या केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या दक्षिण विभागाच्या अतिरिक्त महासंचालक म्हणून कार्यरत आहेत आणि हैदराबाद येथे तैनात आहेत. पुण्याच्या पोलीस आयुक्त असताना २०१५ ते २०१९ या कालावधीत राजकारण्यांचे बेकायदा फोन टॅप केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. राज्य गुप्तचर विभागाचे प्रमुख शुक्ला यांनी महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारचे मंत्री, ज्येष्ठ नेते तसेच सरकारी अधिकाऱ्यांचे फोन बेकायदेशीरपणे टॅप करून गोपनीय माहिती माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत पोहोचवल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला होता.
Join Our WhatsApp Community