भिकाऱ्यांना लखपती बनवणाऱ्या मुंबईतील ठिकाणांवर टोळ्यांचा कब्जा; उत्पन्नावर ठरवला जातोय जागेचा दर

131

भिकाऱ्यांना लखपती बनवणाऱ्या मुंबईतील जागा भीक मागण्यासाठी भाड्याने देण्याचा धंदा टोळ्यांकडून केला जात आहे. या जागांचे दर देखील ठरलेले आहेत, १०० रुपयांपासून ते एक हजार रुपयांपर्यंत दिवसाचे दर ठरले आहेत. या जागेवर भीक मागण्यासाठी भिकाऱ्यांनाकडूनही वसुली केली जाते.

मुंबई महानगरपालिकेच्या २०२०च्या सर्व्हेनुसार २९ हजार भिकारी मुंबईत भीक मागून पोट भरतात. ही आकडेवारी अधिकृत असली तरी आजच्या घडीला मुंबईत जवळपास एक लाखांपेक्षा अधिक लोक मुंबईत भीक मागून आपला उदरनिर्वाह चालवत असल्याची माहिती भिक्षेकऱ्यांसाठी काम करणाऱ्या काही गैरसरकारी संस्थांच्या सर्व्हेतून समोर आले आहे.

मुंबई शहर हे प्रत्येकाचे पोट भरणारे शहर आहे. या शहरात येणारी प्रत्येक व्यक्ती कुठला न कुठला कामधंदा करून आपला उदरनिर्वाह करते. या शहराने अनेकांना भरभरून दिले आहे. या शहरातील भिकारीदेखील लखपती झाल्याच्या अनेक घटना यापूर्वी  समोर आल्या आहेत. अनेकांनी भीक मागणे हा आपला व्यवसाय बनवला आहे तर अनेकजण मिळणाऱ्या भिक्षेवर आपला संसाराचा गाडा चालवत आहेत.

भिकाऱ्यांना लखपती बनवणाऱ्या मुंबईतील ठिकाणांवर टोळ्यांनी कब्जा केला आहे. भिकाऱ्यांना लखपती बनवणाऱ्या या जागा भीक मागण्यासाठी भाड्याने देण्याचा धंदा या टोळ्या करत आहेत. या जागांचे दरदेखील ठरलेले आहेत.  १०० रुपयांपासून ते एक हजार रुपयांपर्यंत दिवसाचे दर ठरले आहेत. या जागेवर भीक मागण्यासाठी भिकाऱ्यांना काही ठराविक रक्कम या टोळ्यांना द्यावी लागते.

( हेही वाचा: ‘जो शिवतीर्थावर होतो तोच शिवसेनेचा एकमेव दसरा मेळावा’, उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांना टोला )

वर्दळीचे ठिकाण, धार्मिक स्थळे, प्रेक्षणीय स्थळ, गर्दीची रेल्वे स्थानके, वाहतूक सिग्नल, बडे रेस्टाॅरंट ही ठिकाणे म्हणजे मुंबईतील भिकाऱ्यांना मोठी कमाई करून देणारी  ठिकाणे आहेत. हाजीअली, गेटवे ऑफ इंडिया ,परदेशी पर्यटक मुंबईत ज्या ठिकाणी भेटी देतात ती ठिकाणे सर्वाधिक कमाई करण्याची ठिकाणे समजली जातात. या ठिकाणांवर बसण्यासाठी भिका-यांकडून दिवसाला ठरलेली रक्कम घेतली जात असल्याचे स्थानिक फेरीवाले दुकानदार यांनी सांगितले.

या जागेत दिवसाला मिळणाऱ्या भिक्षेवर तेथील दर  ठरवले जात असल्याची माहिती गेट -वे ऑफ इंडिया या ठिकाणी भीक मागणाऱ्या राजू मंडल या भिक्षेक-याशी चर्चा करताना समजली. भाडे घेणाऱ्या टोळ्या म्हणजेच पूर्वीपासून या जागेवर भीक मागून गब्बर झालेले पूर्वीचे भिक्षेकरू असल्याची माहिती समोर आली आहे. या जुन्या भिक्षेकरूंनी जणू या जागेचा सातबारा आपल्या नावावर केल्याप्रमाणे वागतात अशीदेखील माहिती समोर आली. मुंबईतील प्रसिद्ध धार्मिकस्थळे भिक्षेकरूंना मोठी कमाई करून देणारी ठिकाणे ठरू लागली आहेत.

मुंबईत भीक मागून लखपती झालेल्या भिकाऱ्यांची नावे काही वर्षांपूर्वी समोर आली होती. तर काही भिकाऱ्यांचा मृत्यू झाल्यानंतर या भिकाऱ्याच्या झोपड्यांत लाखो रुपये मिळून आल्याच्या घटनाची नोंद पोलीस दफ्तरी आहे.

हे आहेत लखपती भिकारी

१)मासू मौलाना वय ७५ वर्षे  संपत्ती- ३० लाख
रोजची कमाई -हजार ते दीड हजार रुपये
भीक मागण्याचे ठिकाणी -अंधेरी वर्सोवा परिसरातील बडे रेस्टॉरंट च्या बाहेर
आंबोली मध्ये वन बीएचके फ्लॅट

२) कृष्णा गीते – वय ६० वर्षे ,  संपत्ती- ५लाख रुपये
भीक मागण्याचे ठिकाण- दक्षिण मुंबई सीपी टॅंक,चर्णी रोड, नालासोपारा येथे वन बीएचके फ्लॅट

३) भरत जैन वय ४५ वर्षे  संपत्ती – ७० लाख
भीक मागण्याचे ठिकाण – आझाद मैदान, सीएसएमटी स्थानक
परळ मध्ये वन बीएचके फ्लॅट, रोजची कमाई ५००रुपये

४) हाजी वय २६ वर्षे  संपत्ती – १५ लाख
भीक मागण्याचे ठिकाण- देवनार,चेंबूर
ट्रॉम्बे येथे वन बीएचके फ्लॅट रोजची कमाई ५०० ते ७०० रुपये

५) गोवंडी येथे एका वयोवृद्धाचा काही वर्षांपूर्वी मृत्यू झाला होता, त्यावेळी रेल्वे पोलिसाना त्याच्या घरात गोन्यामध्ये रोकड आणि चिल्लर मोठ्या प्रमाणात मिळून आली होती.
(लखपती भिकाऱ्यांची ही माहिती ८ वर्षांपूर्वीची आहे.)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.