मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र लढ्यात 107 हुतात्मांनी जेव्हा आपल्या प्राणांची आहुती दिली, तेव्हा त्यांच्या त्यागातून महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. संयुक्त महाराष्ट्र लढ्यातील हुतात्म्यांच्या स्मरणार्थ 21 नोव्हेंबर 1961 रोजी हुतात्मा स्मारक उभारण्यात आले. हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी महाराष्ट्र राज्याने हुतात्मा स्मृती दिन शासकीय इतमामात साजरा करावा, यासाठी संयुक्त महाराष्ट्र लढा स्मृती मंडळाचे अध्यक्ष भाऊ सावंत यांनी पाठपुरावा केल्यानंतर हा दिवस 2000 सालापासून शासकीय इतमामात साजरा होतो.
रविवारी, 21 नोव्हेंबरला हुतात्मा स्मृतीदिनानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हुतात्मा स्मारकास पुष्पचक्र अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी मुंबईचे जिल्हाधिकारी, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर, भाऊ सावंत यांनी हुतात्मा स्मारकास पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले.
(हेही वाचा : टिळक स्मारकाची कौलेही उडाली! साडेचार कोटी गेले कुठे? )
काय आहे स्मारकाचा इतिहास?
राज्य पुनर्रचना आयोगाने महाराष्ट्राला मुंबई देण्याचे नाकारले होते, तेव्हा मराठी बाण्याची मुंबई या अन्यायाने खवळून उठली. सर्वत्र छोट्या-मोठ्या सभांमधून या निर्णयाचा जळजळीत निषेध होत होता. याचा संघटित परिणाम म्हणून कामगार आणि पांढरपेशांचा एक विशाल मोर्चा, तेव्हाच्या विवेकशून्य सरकारचा निषेध करण्यासाठी फ्लोरा फाऊंटनसमोरील चौकात जमा झाला. फोर्ट भागात जमाव आणि सभाबंदी जारी केली होती. सर्व कार्यालयांतील महिला कर्मचाऱ्यांना घरी पाठविले होते. जमावबंदीचा भंग करून, मुंबईकर फ्लोरा फाउंटनाच्या चौकात सत्याग्रहासाठी ठाण मांडून बसले होते. त्यावेळी सत्याग्रहींना उधळून लावण्यासाठी लाठीमार करण्यात आला. मात्र, तरीही ते चौकातून हटत नाहीत हे बघून पोलिसांना गोळीबाराचा आदेश देण्यात आला. मुंबई राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री मोरारजी देसाई यांचे ‘दिसताक्षणी गोळ्या’ घालण्याचे पोलिसांना आदेश होते. प्रेक्षणीय फ्लोरा फाउंटनच्या कारंज्यातील पाण्यासारखेच शांततापूर्ण आंदोलन करणाऱ्या निदर्शकांच्या रक्ताच्या चिळकांड्या काळ्याभोर रस्त्यांवर उडू लागल्या. या सर्व हुतात्म्यांच्या बलिदानापुढे व मराठी माणसाच्या आंदोलनामुळे काँग्रेसी सरकारला नमते घेऊन १ मे १९६० रोजी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची स्थापना करावी लागली. त्यानंतर या जागी हुतात्मा स्मारकाची उभारणी केली गेली.
Join Our WhatsApp Community