मुंबईतील रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनचा तुडवडा जाणवू लागल्यानंतर महापौर किशोरी पेडणेकर यांनी उपनगरीय रुग्णालयांमध्ये भेटी देण्यास सुरुवात केली. सोमवारी त्यांनी दहिसर येथील जंबो फॅसिलिटी केंद्राला भेट देऊन तेथील ऑक्सिजनबाबत आढावा घेतला आणि त्या निघून गेल्या. पण महापौर ज्या प्रवेशद्वारातून शिरुन ही माहिती घेत होत्या, त्याच वेळेला दुसऱ्या प्रवेशद्वारावर ऑक्सिजन नसल्याने रुग्णाला परत जाण्यास सांगितले जात होते. महापौरांच्या भेटीदरम्यानच रुग्णाला दाखल करुन घेता त्यांना दुसरीकडे जाण्याची सूचना केली जात होती, मग महापौरांनी नक्की आढावा कोणता घेतला? त्यामुळे महापौर नक्की आढावा घेतात की, केवळ प्रसिध्दीमाध्यमांसमोर चमकण्यासाठीच या भेटी होतात, असा प्रश्न आता सर्वांना पडू लागला आहे.
काय झाला नेमका प्रकार?
कांदिवली येथील शिवसेना नगरसेविका माधुरी योगेश भोईर यांच्या प्रयत्नाने सुरू करण्यात आलेल्या लसीकरण केंद्राचे उद्घाटन महापौर किशोरी पेडणेकर यांच्या हस्ते पार पडले. त्यानंतर त्यांनी आर-उत्तर विभागातील वॉर रुमला भेट दिली. त्यानंतर दहिसर जंबो कोविड सेंटरमध्ये जाऊन ऑक्सिजन साठ्याचा त्यांनी आढावा घेतला. पण महापौर किशोरी पेडणेकर आणि शिवसेना आमदार विलास पोतनीस यांच्यासह इतर नगरसेवकांनी जेव्हा दहिसर कोविड सेंटरची पाहणी करत होत्या, त्याचवेळी पश्चिम द्रुतगती महामार्गालगत असलेल्या प्रवेशद्वाराजवळ दहिसरमध्ये राहणाऱ्या वयोवृध्द बाधित रुग्णाला ऑक्सिजन अभावी दाखल करुन घेण्यास डॉक्टर मंडळी नकार देत होते. याचे प्रत्यक्ष चित्रणच हिंदी पत्रकार विनोद यादव यांनी केले. त्यांनी या रुग्णाला दाखल करुन का घेतले नाही, याची विचारणा केल्यानंतर एकाही डॉक्टरांनी तसेच कर्मचाऱ्यांनी उत्तर दिले नाही. उलट तेथील सुरक्षा रक्षकांमार्फत या बाधित रुग्णाला आणि त्यांच्या मुलीला बाहेर जाण्याच्या सूचना केल्या जात होत्या.
(हेही वाचाः मुंबईत केवळ १८ दिवसांमध्ये कोरोना रुग्णांचा आजवरचा सर्वाधिक आकडा! मृत्यूही वाढले)
निरर्थक भेटींचा पर्दाफाश
या व्हिडिओमध्ये विनोद यादव यांनी महापौर किशोरी पेडणेकर तसेच नगरसेवक बाळकृष्ण बिद यांना पुढील गेटने पाठवले आहे, तर मागील गेटला ऑक्सिजन नसल्याने रुग्णाला परत पाठवण्याचे प्रकार घडत असल्याचे म्हटले आहे. जर महापौर त्या केंद्राची पाहणी करायला जातात, तर मग त्यांना तेथील ऑक्सिजनच्या तुटवड्याची माहिती दिली जात नाही की, ही माहिती डॉक्टरांकडून लपवली जात आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यामुळे महापौरांनी सी.सी.टिव्हीत जे पाहिले त्यापेक्षा वस्तूस्थिती वेगळी होती आणि एका जागरुक पत्रकाराने ही बाब समोर आणली आहे. त्यामुळे रुग्णालयांना भेटी देऊन खमंग प्रसिध्दी मिळवणाऱ्या महापौरांच्या भेटी या कशाप्रकारे निरर्थक आहेत, याचा पर्दाफाश झाला आहे.
Join Our WhatsApp Community