मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत (एमएमआरडीए) अंधेरी पूर्व ते दहिसर पूर्व मेट्रो ७ आणि दहिसर पश्चिम ते डीएन नगर या मेट्रो २ अ या दोन्ही मार्गांचा पहिला टप्पा गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर प्रवाशांच्या सेवेत खुला करण्यात येणार आहे. मेट्रो मार्ग ७ आणि मेट्रो २ अ या मार्गावरील प्रत्येकी ९ स्थानके प्रवाशांच्या सेवेत येणार आहेत. त्यामुळे पाडव्याच्या मुहुर्तापासून दोन मेट्रो मार्गिकांची भेट मुंबईकरांना देण्यात येणार असून मेट्रो मार्गिका २ अ आणि मेट्रो ७ मार्गिकेच्या फेऱ्यांना सुरूवात होणार आहे.
कोणत्या स्थनाकादरम्यान धावणार मेट्रो?
पश्चिम उपनगरातील वाहतूक कोंडी दूर करून प्रवास वेगवान करण्यासाठी ‘मेट्रो २’ आणि ‘मेट्रो ७’ मार्गिका प्रकल्प एमएमआरडीएने हाती घेतला आहे. ‘मेट्रो २’ मार्गिकेअंतर्गत दहिसर ते डी. एन. नगर अशी ‘मेट्रो २ अ’ मार्गिका तर दहिसर ते अंधेरी अशी ‘मेट्रो ७’ ही मार्गिका असणार आहे. दहिसर ते डहाणूकरवाडी मेट्रो २ अ मार्गावरील दहिसर, आनंद नगर, कांदरपाडा, मंडपेश्वर, एक्सर, पहाडी एक्सर, कांदिवली, डहाणूकर वाडी या स्थानकांवर मेट्रो धावेल; तर मेट्रो ७ मार्गावर आरे, दिंडोशी, कुरार, आकुर्ली, पोईसर, मागाठाणे, देवी पाडा, राष्ट्रीय उद्यान, ओवरी पाडा या स्थानकांदरम्यान मेट्रो धावणार आहे.
(हेही वाचा – भावी डॉक्टरांनो, पहिल्याच वर्षी गाव निवडा; MBBS च्या अभ्यासक्रमात बदल!)
कोणाला होणार फायदा
मेट्रो २ अ चा डहाणूकरवाडी ते आरे आणि मेट्रो ७ चा दहिसर ते आरे असा पहिला टप्पा असणार आहे. दहिसर ते आरे (पश्चिम द्रुतगती मार्ग) हे अंतर रस्ते मार्गे पार करण्यासाठी दीड तास, गर्दीच्या वेळेस त्यापेक्षा अधिक काळ लागतो. वाहतूक कोंडीचा सामना करून हा प्रवास करावा लागतो. लोकलच्या गर्दीतून, धक्काबुक्की सहन हा प्रवास करावा लागतो. पण आता वातानुकूलित गाडीचा हा प्रवास काही मिनिटात, सुकरपणे पार करता येणार आहे. मात्र याचा फायदा विद्यार्थ्यांसह महिला वर्गाला देखील मिळणार आहे.
- या मेट्रोमध्ये महिलांसाठी विशेष कोचची व्यवस्था
- ड्रायव्हरलेस ऑपरेशनसाठी ट्रेन डिझाईन करण्यात आल्या आहेत
- सुरक्षिततेसाठी प्लॅटफॉर्म स्क्रीन डोअर्स
- दिव्यांग प्रवाशांसाठी मेट्रो स्थानकांवर सुविधा
- प्रथमोपचाराची रेल्वे स्टेशनवर सुविधा
मिळालेल्या माहितीनुसार, पहिल्या टप्प्यासाठी १०, २०, ३०, ४० आणि ५० रुपये असे तिकीट दर असणार आहेत. सध्या पासची सुविधा उपलब्ध नसली तरी लवकरात लवकर पासची सुविधा उपलब्ध करून देण्याच्या प्रयत्नासह शाळा, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना मेट्रो प्रवासात सवलत देण्यात येणार आहे.
असं असणार वेळापत्रक
- मेट्रोकडून एकूण ११ ट्रेन्स या मेट्रो २ अ आणि मेट्रो ७ मार्गावर चालवण्यात येणार असून प्रत्येक ट्रेनला ६ कोचेस तर ११ ट्रेन्सची एकूण कोचेसची संख्या ६६ इतकी आहे.
- सकाळी ६ ते रात्री १० वाजेपर्यंत या फेऱ्या चालविण्यात येणार आहेत.
- या ट्रेनची प्रवासी क्षमता ही २२८० प्रवासी प्रति ट्रेन इतकी आहे. तर प्रत्येक कोचनिहाय ५० जणांची क्षमता असणार
- ताशी ७० किमी वेगाने या ऑपरेट करण्यासाठी एमएमआरडीएला परवानगी
Join Our WhatsApp Community