गोरेगाव येथून बेपत्ता झालेल्या १९ वर्षीय तरुणीचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत वर्सोवा येथील समुद्र किनारी आढळून आला आहे. मारेकऱ्याने इंटरनेटच्या वायरने तरुणीचे हातपाय बांधून तिची हत्या करून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह समुद्रात टाकला असावा, अशी शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. या प्रकरणी वर्सोवा पोलिसांनी हत्या आणि पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. हत्या कोणी व का केली हे अद्याप स्पष्ट होऊ शकले नसले, तरी लवकरच या हत्येचा उलगडा करण्यात येईल, असे पोलिसांनी सांगितले आहे.
तरुणी झाली होती बेपत्ता
मृत तरुणी गोरेगाव येथे आई वडिलांसह राहत होती. तिचे वडील कॅब चालक असून तरुणी ही कॉलेजच्या शेवटच्या वर्षाला होती व ती वैद्यकीय क्षेत्रात प्रवेश घेण्याची तयारी करत होती, अशी माहिती पोलिसांनी दिली. मंगळवारी (२४ एप्रिल) रोजी दुपारी ही तरुणी कोचिंग क्लासेसला जात असल्याचे सांगून घरातून बाहेर पडली होती. त्यानंतर रात्री उशिरा तिचा मोबाईल फोन बंद झाला होता. कुटुंबीयांनी तिचा रात्रभर शोध घेतल्यानंतर दुसऱ्या दिवशी वडिलांनी गोरेगाव पोलिस ठाण्यात हरवल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती.
(हेही वाचाः चंद्रपूरने मोडला तापमानाचा 100 वर्षांचा रेकॉर्ड!)
पोलिसांना सापडला मृतदेह
गुरुवारी सायंकाळी या तरुणीचा मृतदेह वर्सोवा येथील समुद्रात तरंगत असताना स्थानिकाने बघितल्यानंतर त्याने वर्सोवा पोलिसांना कळवले. वर्सोवा पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन मृतदेह पाण्याच्या बाहेर काढून तपासला असता सदर मृतदेह कुजलेल्या अवस्थेत सापडला. मृतदेहाचे हात-पाय इंटरनेटच्या केबलने बांधलेले होते. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी कूपर रुग्णालयात पाठवला आहे.
तरुणी गेली कुठे?
वर्सोवा पोलिसांनी मृत तरुणीची ओळख पटवली असता, मंगळवारी गोरेगाव येथून बेपत्ता झालेल्या तरुणीचा हा मृतदेह असल्याचे उघडकीस आले. तिच्या आई-वडिलांनी मृतदेह ओळखला आहे. पोलिसांच्या प्राथमिक तपासात सदर तरुणी ही दुपारी क्लासेसला जाते म्हणून घराबाहेर पडली होती, मात्र ती क्लासेसला गेलीच नसल्याचे समोर आले. तरुणी रात्री ९ वाजता एका मैत्रिणीच्या घरी गेली होती, त्यानंतर रात्री ११ वाजता तिचा मोबाईल फोन बंद झाला. तरुणी रात्री मैत्रिणीच्या घरातून बाहेर पडल्यावर कुठे गेली याचा तपास पोलिस करत आहेत.
(हेही वाचाः गणेश नाईक यांना अटक होणारच, जामीन अर्ज फेटाळला)
शवविच्छेदन अहवाल येणार
घटनास्थळी मिळालेल्या पुराव्यांवरून पोलिस तिच्या मारेकऱ्यांचा शोध घेत असून, या तरुणीच्या मित्र-मैत्रिणींकडे चौकशी सुरु आहे. या तरुणीचे एका दुसऱ्या धर्माच्या तरुणासोबत प्रेम प्रकरण सुरू होते, अशी प्राथमिक माहिती पोलिसांच्या हाती लागली आहे. त्या अनुषंगाने पोलिसांचे तपास पथक शोध घेत आहे. या तरुणीवर हत्येपूर्वी शारीरिक अत्याचार झाला की नाही हे शवविच्छेदन अहवालानंतर स्पष्ट होईल.