मुंबई महापालिकेत कोरोना! १८ दिवसात १७२ कर्मचारी, अधिकारी बाधित

मुंबईत कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत असताना यामध्ये आता फ्रंटलाईन वर्कर असलेले मुंबई महापालिकेचे कामगार, कर्मचारी व अधिकारीही पुन्हा एकदा कोरोनाच्या विळख्यात अडकले जात आहेत. १७ डिसेंबर पासून अवघ्या १८ दिवसातच १७२ कर्मचारी हे कोरोना बाधित झाले आहेत. त्यामुळे आजवर कोरोना बाधित होण्याची एकूण संख्या ७ हजार ०२१ पर्यंत पोहीचली आहे. कर्मचारी अधिकारी यांच्या शिवाय महापालिका रुग्णालयातील डॉक्टर आणि नगरसेवकानाही कोरोनाने गाठले आहे.

अधिकाऱ्यांसह सगळेच पुन्हा कोरोनाचे शिकार

मुंबईत मागील १७ डिसेंबरपासून कोरोना रूग्ण वाढीला सुरुवात झाली. तेव्हापासून ते ५ जानेवारी पर्यंत ६७ हजार १२०  रुग्ण आढळून आले. या वाढत्या रुग्ण वाढीमुळे मुंबईत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. यात आता मुंबई महापालिकेच्या कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे. महापालिकेतील चतुर्थ श्रेणीतील कामगारांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांसह सगळेच पुन्हा एकदा कोरोनाचे शिकार झाले आहेत. वरिष्ठांमध्ये उपायुक्त पदावरील चार अधिकारी बाधित झाले आहेत. याशिवाय महापालिका रुग्णालयातील डॉक्टर आणि रुग्णालयीन कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा झाली आहे.

सेव्हन हिल्समध्ये बुधावरपर्यंत ७५ टक्के खाटा फुल्ल

मुंबईतील सेव्हन हिल्स हे रुग्णालय कोविडचा विशेष रुग्णालय म्हणून ओळखले जात असून महापालिकेचे कर्मचारी, डॉक्टर आदींवर सेव्हन हिल्स रुग्णलयात उपचारासाठी दाखल केले आहे. मुंबईतील इतरही रुग्ण या रुग्णालयात दाखल करण्यात येत असल्याने या एकट्या सेव्हन हिल्स रुग्णालयात बुधावरपर्यंत एकूण क्षमतेच्या ७० ते ७५ टक्के खाटा भरल्या गेल्या असल्याची माहिती मिळत आहे. मुंबई महापालिकेच्या विविध खाते आणि विभागांमधील बाधित कर्मचाऱ्यांची संख्या वाढत असून बुधवार पर्यंत १७२ कामगार, कर्मचारी आणि अधिकारी हे १७ डिसेंबरपासून बाधित झाल्याची माहिती मिळत आहे.

(हेही वाचा – स्वत:चे कर्ज फेडण्यासाठी सरकारी कर्मचा-याने ‘असा’ रचला डाव)

स्थायी समिती अध्यक्षांना कोरोना

एकाबाजूला मंत्री, आमदार हे कोरोना बाधित होत असतानाच आता मुंबईतील नगरसेवकही बाधित होऊ लागले आहेत. स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव हे कोरोना बाधित झाले आहेत. त्यांचे स्वीय सहायक आणि खासगी सुरक्षा रक्षक हे बाधित आढळून आले होते. त्यानंतर त्यांची चाचणी केल्यानंतर ते पॉझिटिव्ह आढळून आले. त्यांच्यावर प्रिन्स अली रुग्णलयात उपचार सुरू आहे. तर शिवसेना नगरसेवक अमेय घोले हेही पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. यासह मुंबईतील नगरसेवक हे बाधित होत आहेत.

एक प्रतिक्रिया

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here