आधी पदपथाचे काम निकृष्ट, अन् चालले आता सौंदर्यीकरण करायला!

112

माटुंगा पश्चिम येथील ज्या टी.एच.कटारिया मार्गाच्या पदपथाच्या नुतनीकरणाचे काम अत्यंत निकष्ट दर्जाचे बनवण्यात आले आहे, त्याच पदपथाची सुधारणा महापालिका करायला निघाली आहे. या मार्गावरील पदपथाचे बांधकाम आधी निकृष्ट दर्जाचे केले असताना अवघ्या दीड ते दोन महिन्यांमध्ये पुन्हा खोदून त्या पदपथाची वाट लावण्यात आली. मात्र आता त्याच मार्गावरील पदपथाचे सौंदर्यीकरण करण्याचा निर्णय मुंबई महापालिकेने घेतला आहे. विशेष म्हणजे हा प्रभाग सभागृहनेत्यांचा असून त्यांच्याच प्रभागातील पदपथांचे काम योग्यप्रकारे करून घेण्यात त्यांना यश येत नसून कंत्राटदारांवर व अधिकाऱ्यांवरही सभागृहनेत्यांचा अंकुश नसल्याचेही यावरून स्पष्ट होत आहे.

३७ टक्क्यांपेक्षा कमी दरात मिळवले काम

मुंबई महापालिकेच्या जी/उत्तर विभागाच्यावतीने सेनापती बापट मार्ग व प्रमोद महाजन उद्यान, टी.एच. कटारिया मार्ग, शीव –वांद्रे लिंक रोड, एल.जे. रोडच्या पदपथाचे सौंदर्यीकरण व सुधारणा करण्याचा करण्याचा निर्णय घेतला असून याबाबतची निविदा मागवण्यात आली आहे. तसेच प्रमोद महाजन उद्यानाच्या भिंतीच्या पुनर्बांधणी व सौंदयीकरणाचाही यामध्ये सामावेश आहे. यासाठी महापालिकेच्या जी उत्तर विभागाने मागवलेल्या निविदेमध्ये प्रशासनाच्या अंदाजित ३ कोटी २१ लाख ४१ हजार ७३९ रुपयांच्या कंत्राट कामांच्या तुलनेत पात्र कंत्राटदाराने २ कोटी ५६ लाख ६३ हजार रुपयांची बोली लावली आहे. प्रशासनच्या कंत्राट किंमतीच्या तब्बल ३७ टक्के कमी दरात बोली लावून त्यांनी हे काम मिळवले आहे. या कामासाठी चंद्रा कंस्ट्रक्शन कंपनी पात्र ठरली आहे.

(हेही वाचा- अर्जुन खोतकरांच्या घरी मध्यरात्रीपर्यंत ईडीचे छाप)

कोणत्या पदपथाचे काम होणार, अस्पष्ट

विशेष म्हणजे या प्रस्तावामध्ये ज्या टि.एच. कटारिया मार्गाच्या पदपथाचा उल्लेख केला आहे. त्यातील संदेश हॉटेल ते माटुंगा टि सप्लाय इथपर्यंतच्या पदपथाचे काम मागील अडीच ते तीन महिन्यांपूर्वी पार पडले आहे. या पदपथावर स्टॅम्पिंग काँक्रीटीकरण करण्यात आले असले तरी प्रत्यक्षात हे बांधकाम अत्यंत निकृष्ट दर्जाचे आहे. यावरील स्टॅपिंगच दिसून येत नाही. परिणामी या पदपथाचे काम दोन ते चार वर्षांपूर्वी पार पडले की काय असा प्रश्न उपस्थित होत आहे. मात्र टी.एच. कटारिया मार्गावरील कोणत्या पदपथाचे काम केले जाणार आहे, याचा स्पष्ट उल्लेखही करण्यात आला नाही. याबरोबरच एल.जे. मार्गावरही दोन ते तीन महिन्यांपूर्वी पदपथांचे काँक्रिटीकरण करण्यात आले आहे. त्यामुळे एल. जे. मार्गावरील कोणत्या पदपथांची सुधारणा केली जाणार आहे, याचाही स्पष्ट उल्लेख नाही.

सीएसआर निधीही आणि महापालिकेचा पैसाही

प्रमोद महाजन उद्यान आणि प्रमोद महाजन उद्यानाच्या संरक्षक भिंतीची पुनर्बांधणी व सौंंदर्यीकरणाच्या कामाचाही यामध्ये समावेश करण्यात आला आहे. परंतु हे काम न्युक्लियस ग्रुप ते स्टुडीओपॉड या कंपनीच्या सीएसआर निधीतून करण्यात येत आहे. त्यामुळे जे काम सीएसआर निधीतून करण्यात येत आहे, त्याही कामांचा समावेश करत प्रशासनातील अधिकारी अनावश्यक पैसा खर्च दाखवत असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.