गेले दोन दिवस रोज सातशेहून अधिक रुग्ण आढळून येत असल्याने धास्तावलेल्या पालिका आरोग्य विभागाने आता मुंबईतील कोरोना तपासणीच्या चाचण्या वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. यासह सध्या कोरोनाचे वाढते रुग्ण लक्षात घेता पालिकेचे जम्बो कोविड केंद्रे आणि खासगी रुग्णालयांनाही अलर्ट जारी केला आहे. कोरोनासह पावसाळी आजारासाठीही पुरेशी तयारी केल्याचा दावा पालिका आरोग्य विभागाने केला.
( हेही वाचा : मुंबईत झाडांच्या फांद्या छाटणीचे ९० टक्के काम पूर्ण)
चाचण्यांचा आकडा वाढवला जाईल
ओमायक्रॉन विषाणूमुळे गेल्या आठवड्यापासून रुग्णसंख्या वाढत असल्याचे संकेत मिळत असताना राज्याच्या तुलनेत मुंबईतही ७० टक्के नव्या कोरोना रुग्णांची नोंद होत आहे. रुग्णसंख्या वाढत असल्याने सध्या हजार चाचण्यांचा आकडा आता गरजेनुसार टप्प्याटप्प्याने २५ हजारांवर वाढवला जाईल, अशी माहिती पालिका आरोग्य विभागाच्या अधिका-यांनी दिली. त्याच कोरोनासह आता पावसाळा तोंडावर आल्याने पावसाळी आजारांची जागरुकता म्हणून पालिका रुग्णालयात बेडची व्यवस्था तयार करण्यात आली आहे. मलेरिया, डेंग्य तसेच पावसाच्या पाण्यात प्रवास केल्याने इतर संसर्गजन्य आजारांवर मुंबईकरांना तातडीने उपचार मिळावेत म्हणून मुंबईतील ५ वैद्यकीय महाविद्यालयासह कस्तुरबा रुग्णालयातही रुग्णांसाठी पुरेशा सोयीसुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. पालिकेने सध्या १ हजार ६३४ बेड पावसाळी आजारांसाठी राखीव ठेवले आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून पुरेसा औषध साठाही उपलब्ध केल्याची माहिती आरोग्य विभागाकडून दिली गेली.
Join Our WhatsApp Community