मुंबई महापालिकेचे प्रभाग आरक्षण लांबणीवर, अजून महिन्याभराची फुरसत!

२०११ मधील लोकसंख्येच्या आधारे वाढणार प्रभाग

77

मुंबई महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या प्रभागांचे आरक्षणाची चिंता नगरसेवकांसह इच्छुक उमेदवारांना लागून राहिलेली असतानाच राज्य सरकारने मुंबईतील नगरसेवकांची संख्या ९ ने वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पुढील दहा दिवसांमध्ये जाहीर होणारे प्रभाग आरक्षण लांबणीवर पडले जाणार आहे. प्रभागांची संख्या वाढवण्यात येत असल्याने यासाठीची प्रभागांची निश्चिती करण्यासच कमीत कमी २५ ते ३५ दिवसांचा कालावधी लोटला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे २३६ प्रभागांची निश्चिती झाल्यानंतरच आता डिसेंबर तिसऱ्या किंवा शेवटच्या आठवड्यात आरक्षण पडले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

(हेही वाचा – मुंबई महानगरपालिकेत ९ प्रभाग वाढवण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय)

महिन्यापेक्षा अधिक कालावधी लोटला जाण्याची शक्यता

मुंबई महापालिकेत नगरसेवकांच्या प्रभागांची संख्या २२७ एवढी असून पाच नामनिर्देशित सदस्यांची निवड पक्षीय बलाबलानुसार केली जाते. मुंबईमध्ये २२१ वरून २२७ एवढी नगरसेवक संख्या करण्यात आली हाती. परंतु आता ही संख्या आता ९ ने वाढवून २३६ एवढी करण्याचा निर्णय राज्य मंत्रीमंडळाच्या कॅबिनेटच्या बैठकीत घेण्यात आला आहे. सरकारने आता प्रभागांची संख्या वाढवण्याचा निर्णय घेतल्याने महापालिकेच्या निवडणूक विभागाला प्रभागांचा फेरआढावा घेऊन त्याप्रमाणे सुधारीत प्रभागांची निश्चिती करावी लागणार आहे. या प्रभाग निश्चितीची कार्यपध्दत क्लिष्ट असल्याने या कामासाठी कमीत कमी २५ दिवसांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. सर्व प्रकारे युध्दपातळीवर ही कामे केल्यानंतरही लोकांकडून हरकती व सूचना मागवून त्यानुसार अंतिम प्रभागांची निश्चिती करण्यास किमान महिन्यापेक्षा अधिक कालावधी लोटला जाण्याची शक्यता निवडणूक विभागातील अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे जोवर प्रभाग निश्चिती केली जात नाही, तोवर प्रभाग आरक्षण टाकले जाणे शक्य नाही. त्यामुळे डिसेंबरपर्यंत प्रभाग आरक्षण पडले जाणार असून ते आरक्षण डिसेंबरच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात पाडले जाईल, अशीही शक्यता वर्तवली जात आहे.

२०११ मधील लोकसंख्येच्या आधारे वाढणार प्रभाग

मुंबई महापालिकेच्या २२७ नगरसेवकांची प्रभाग संख्या ही २००१ च्या लोकसंख्येनुसार वाढवण्यात आली होती. त्यानंतर २०११ मध्ये जनगणना झाल्यानंतर वाढलेल्या लोकसंख्येनुसार प्रभागांची संख्या वाढवण्यात आली नव्हती. परंतु २०२२ च्या सार्वत्रिक निवडणुकीत २०११च्या जनगणेनुसारच होणार असल्याने प्रभागांची संख्याही आता २०११ मधील लोकसंख्येच्या आधारे वाढवण्यात येणार असल्याचीही माहिती राज्य निवडणूक विभागाच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.