मुंबई महापालिका खरेदी करणार ३५ इलेक्ट्रिक वाहने

महाराष्ट्र इलेक्ट्रिक वाहने धोरण २०२१ नुसार मुंबई महानगरपालिकेच्या वतीने प्रशासनाच्या वापरासाठी ३५ इलेक्ट्रिक वाहने खरेदी करण्यात येणार असून या खरेदीची  प्रक्रिया सुरू आहे. त्याचप्रमाणे बेस्ट उपक्रम अंतर्गत सुमारे २,१०० इलेक्ट्रिक सिंगल डेकर बसेस तर ९०० डबल डेकर इलेक्ट्रिक बसेस खरेदी करण्याची कार्यवाही सुरू आहे. सप्टेंबर २०२३ अखेरपर्यंत ही खरेदीची प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार  आहे.
मुंबईत मागील काही दिवसांपासून हवामान विषयक कारणांमुळे तसेच सर्वत्र सुरू असलेल्या विविध विकास कामांमधून निर्माण होत असलेल्या धुळीमुळे हवेचा गुणवत्ता स्तर खालावला आहे. ही परिस्थिती लक्षात घेता त्यावर तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश राज्याचे मुख्यमंत्री  एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. त्यानुसार महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक  इक्बाल सिंह चहल यांच्या सूचनेनुसार अतिरिक्त  आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. संजीव कुमार यांच्या अध्यक्षतेखाली महानगरपालिका प्रशासनातील विविध खात्यांच्या अधिकाऱ्यांची  ८ मार्च २०२३ रोजी महानगरपालिका मुख्यालयात आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीला उपायुक्त (पर्यावरण) अतुल पाटील, विशेष कार्य अधिकारी  सुनील सरदार यांच्यासह विकास व नियोजन, रस्ते व वाहतूक, यांत्रिकी व विद्युत, घनकचरा व्यवस्थापन, घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प, बेस्ट उपक्रम इत्यादी खात्यांचे प्रतिनिधी या  उपस्थित होते.

आणखी २५ ठिकाणी इलेक्ट्रिक वाहने चार्जिंग सुविधा!

या बैठकीत अधिकाऱ्यांनी माहिती देताना, मुंबईत विविध प्राधिकरणामार्फत वेगवेगळ्या ठिकाणी मिळून आतापर्यंत ४८६ चार्जिंग स्टेशन उभारली गेली आहेत. महानगरपालिकेच्या वतीने आणखी २५ ठिकाणी इलेक्ट्रिक वाहने चार्जिंग सुविधा उभारण्याची कार्यवाही सुरू असल्याचे सांगितले.

सप्टेंबर २०२३ पर्यंत बेस्टच्या सर्व बसेस इलेक्ट्रिक!

त्याचप्रमाणे बेस्ट उपक्रम अंतर्गत सुमारे २,१०० इलेक्ट्रिक सिंगल डेकर बसेस तर ९०० डबल डेकर इलेक्ट्रिक बसेस खरेदी करण्याची कार्यवाही सुरू आहे. सप्टेंबर २०२३ अखेरपर्यंत ही खरेदी प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहे. यामुळे सार्वजनिक वाहतुकीत इलेक्ट्रिक वाहनांना प्राधान्य देऊन प्रदूषण नियंत्रित होण्यास मदत होणार आहे.

आतापर्यंत २५८ वाहतूक दिवे चौक हे स्वयंचलित !

त्याचप्रमाणे, शासनाच्या सूचनेनुसार जुनी वापरात असलेली डिझेलवर धावणारी वाहने सीएनजी मध्ये रूपांतरित करून घेण्याची कार्यवाहीही करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे मुंबईतअसलेल्या ६५२ वाहतूक दिवे चौक (ट्रॅफिक सिग्नल जंक्शन) पैकी आतापर्यंत २५८ वाहतूक दिवे चौक हे स्वयंचलित पद्धतीने कार्यरत करण्यात आले आहेत. उर्वरित वाहतूक दिवे चौक देखील टप्प्याटप्प्याने स्वयंचलित यंत्रणेवर कार्यरत करण्यासाठी आयआयटी मुंबई यांची सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. जून २०२३ पर्यंत त्यांच्याकडून अहवाल येणे अपेक्षित आहे, अशी माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी या बैठकीत दिली.

देवनार मधील ऊर्जा निर्मिती प्रकल्प होणार ऑक्टोबर २०२५ होणार पूर्ण!

घनकचऱ्यातून उद्भवणाऱ्या हवा प्रदूषणाविषयी देखील अतिरिक्त आयुक्त डॉ. संजीव कुमार यांनी संपूर्ण आढावा घेतला. महानगरपालिकेच्या वतीने देवनार क्षेपणाभूमी येथे ६०० टन प्रतिदिन घनकचऱ्यावर शास्त्रोक्त प्रक्रिया करून त्याद्वारे ४ मेगावॅट ऊर्जा निर्मिती करण्याचा प्रकल्प उभारण्यात येत आहे. त्यासाठी कार्यादेश देण्यात आले असून या प्रकल्पाचे काम पूर्ण होऊन ऑक्टोबर २०२५ मध्ये तो कार्यान्वित करण्याचे नियोजन केले आहे.

दररोज ३२ टन घातक कचऱ्यावर होणार प्रक्रिया!

घरगुती घातक कचऱ्यावर शास्त्रोक्त प्रक्रिया करण्यासाठी देखील महानगरपालिकेच्या वतीने ओशिवरा, धारावी आणि मालाड येथे प्रक्रिया केंद्र सुरू करण्यात आले आहेत. याव्यतिरिक्त आणखी आठ ठिकाणी अशा स्वरूपाचे केंद्र सुरू करण्यात येणार असून या नवीन आठ केंद्राद्वारे प्रत्येकी दररोज सुमारे ४ टन म्हणजे दररोज एकूण ३२ टन घरगुती घातक कचऱ्यावर प्रक्रिया करणे शक्य होणार आहे. या नवीन केंद्रासाठीचे कार्यादेश देखील देण्यात आले आहेत, असे संबंधित अधिकाऱ्यांनी नमूद केले.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here