दोन लाखांची लाच घेताना महापालिका अभियंत्याला अटक

157
मुंबई महानगरपालिकेतील इंजिनिअरकडे साडेसतरा लाख रुपयांची रोकड सापडल्याने, खळबळ उडाली आहे. या सहायक अभियंत्यासह दोघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सोमवारी लाच स्वीकारताना अटक केली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला अभियंत्याच्या कार्यालयातील टेबलमध्ये १७.६५ लाख रुपयांची रोकड सापडल्याने खळबळ उडाली आहे.
सहाय्यक अभियंता अमोल थविल (३९) आणि उपअभियंता दत्तात्रय माने (३६)असे लाचखोर अधिका-यांचे नाव आहे. हे दोघे मुंबई महानगरपालिकेच्या डी वॉर्ड मध्ये कार्यरत होते.

अभियंत्याला लाच घेताना पकडले

एसीबी अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदाराला पावसाळ्यासाठी तात्पुरते शेड बांधायचे होते. शेड बांधण्यासाठी, ते अधिकार्‍यांकडे परवानगी मागण्यासाठी गेले होते. सहाय्यक अभियंता अमोल थविल यांनी परवानगी देण्यासाठी २ लाख रुपयांची मागणी केली आणि नंतर वाटाघाटीनंतर ही रक्कम १.९० लाख रुपये ठरली, असे एसीबीच्या अधिकाऱ्यांनी  सांगितले. तक्रारदाराने एसीबी अधिकाऱ्यांकडे धाव घेतली. एसीबीच्या अधिकाऱ्यांनी या मागणीची पडताळणी करून, सापळा रचला. तक्रारदार रक्कम घेऊन बीएमसी कार्यालयात गेल्यावर माने या अभियंत्याने ती रक्कम स्वीकारली. माने यांना एसीबीच्या अधिकार्‍यांनी तत्काळ ताब्यात घेतले, त्यानंतर अधिकार्‍यांनी माने यांना थविलला फोन करून पैसे मिळाल्याची माहिती देण्यास सांगितले.
‘आम्ही थविलच्या केबिनची झडती घेतली आणि त्याच्या टेबलच्या ड्रॉवरमध्ये रोख १७,६४,५०० रुपयांची रोकड मिळाल्याचे’ एसीबीच्या अधिकाऱ्याने सांगितले. थविल यांच्या कार्यालयातील ड्रॉवरमध्ये सापडलेली रक्कम कुणाची आहे आणि कुठून आली याबाबत तपास सुरू असल्याची माहिती एसीबीने दिली आहे. तसेच, थविल आणि माने यांच्या संपत्तीबाबत चौकशी करण्यात येत असल्याची माहिती एसीबीच्या अधिका-यांनी दिली आहे.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.