बिटकॉइनच्या माध्यमातून ड्रग्स खरेदी करणा-या क्रिप्टोकिंगला अटक 

त्याच्याकडून ड्रग्ज घेणार्‍यांची एक यादीच काढली जात असल्याचे सांगण्यात आले.

डार्कनेट वेबसाईटच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात ड्रग्सचा व्यापार केला जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या व्यापारासाठी चलनी नोटांचा वापर न करता ‘क्रिप्टो करन्सी’चा वापर करुन परदेशातून मोठ्या प्रमाणात महागड्या ड्रग्सची खरेदी केले जात आहे. क्रिप्टोकरन्सीच्या माध्यमातून ड्रग्स मागवणारे ‘क्रिप्टोकिंग’ भारतासह मुंबईत मोठ्या प्रमाणात तयार झाले असून, अशाच एका क्रिप्टोकिंगला नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने नुकतीच मुंबईतून अटक केली आहे.

असा अडकला क्रिप्टोकिंग

मकरंद प्रदीप आडिवरेकर ऊर्फ क्रिप्टोकिंग असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. युरोप देशातून मोठ्या प्रमाणात एलएसडी ब्लॉट पेपर भारतात येत असून, अटक करण्यात आलेला मकरंद हा त्यात सक्रिय होता. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या पथकाने मालाड मालवणी येथील खारोडी येथून, एका ड्रग्स पेडलरला अटक केली होती. त्याच्याकडून नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने मोठ्या प्रमाणात ड्रग्सचा साठा जप्त केला होता. या ड्रग्स पेडलरच्या चौकशीत अनेक खुलासे करण्यात आले. भारतात युरोप मधून येणारे ड्रग्स हे डार्कनेट वरुन मागवले जाते आणि बिटकॉइनच्या माध्यमातून या ड्रग्सची खरेदी केली जात होती. या सर्वात मकरंद याचे नाव समोर आले होते, त्याची या क्षेत्रात क्रिप्टोकिंग नावाने ओळख होती अशी माहिती नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोला मिळाली होती.

(हेही वाचाः डार्कनेटची ‘काळा कांडी’: हे नक्की वाचा… नाहीतर तुम्हीही येऊ शकता गोत्यात)

असा करत होता व्यवहार

या कारवाई नंतर मकरंद हा पळून गेला होता. या गुन्ह्यात नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोला पाहिजे असणाऱ्या मकरंद ऊर्फ क्रिप्टोकिंग याला बुधवारी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने अटक केली आहे. कारवाईच्या भीतीने ड्रग्ज पेडलर या ड्रग्ज व्यवहारात बिटकॉइनचा वापर करत होते. बिटकॉइन क्रिप्टो करन्सीचा एक भाग असून, ही करन्सी एका व्यक्तीकडून दुसर्‍या व्यक्तीला सहज पाठवता येते. मकरंद हा नशेबाजांना ड्रग्ज देण्यासाठी बिटकॉइनच्या माध्यमातून पैसे घेत होता. त्याने आतापर्यंत अनेकांना अशा प्रकारे ड्रग्ज पुरवल्याचे उघडकीस आले आहे. त्याच्याकडून ड्रग्ज घेणार्‍यांची एक यादीच काढली जात असल्याचे सांगण्यात आले.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here