भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त दादरमधील चैत्यभूमीवर शेकडो अनुयायी अभिवादन करण्यासाठी दाखल झाले आहेत. सामान्य नागरिकांसह राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, महापौर किशोरी पेडणेकर सकाळी चैत्यभूमवीर दाखल झाले होते. यानंतर एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडेदेखील चैत्यभूमीवर दाखल होऊन बाबासाहेबांना अभिवादन केले. मात्र यावेळी तेथून बाहेर पडताना त्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आल्याचे पाहायला मिळाले. या प्रकारामुळे चैत्यभूमी परिसरात गोंधळ झाला. यावेळी तेथील परिस्थिती पोलिसांनी नियंत्रणात आणली.
भीमशक्ती रिपब्लिकन सेनेकडून घोषणाबाजी
समीर वानखेडे चैत्यभूमीवर दाखल झाले होते. यावेळी त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केले यानंतर भीमशक्ती रिपब्लिकन सेनेकडून घोषणाबाजी करण्यात आली. दरम्यान, भीमशक्ती रिपब्लिकन सेनेकडून वानखेडेंच्या उपस्थितीवर आक्षेप घेण्यात आला. समीर वानखेडेंना बाबासाहेबांना अभिवादन करण्याचा नैतिक अधिकार नाही. जर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करायचे असेल तर त्यांच्या विचारधारेवर चालले पाहिजे तसेच समीर वानखेडेंना आजच चैत्यभूमीवर येण्याची गरज का भासली?, असा प्रश्नही भीमशक्ती रिपब्लिकन सेनेकडून उपस्थितीत करण्यात आला.
(हेही वाचा- डॉ. बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबई लोकलकडून विशेष सेवा)
अल्पसंख्याक विकास कॅबिनेट मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिकही चैत्यभूमीवर दाखल झाले. यावेळी ते म्हणाले, “बाबासाहेबांना अभिवादन करणे हा प्रत्येकाचा अधिकार आहे. अभिवादन करणारे एखाद्या धर्माचे, समाजाचे असे म्हणणं चुकीचे आहे. आम्ही दरवर्षी इथे येतो. काही लोकांनी येणं सुरु केलं आहे हे चांगलं आहे.”
Join Our WhatsApp Community