आम्ही हेल्मेट घालतो, पण रस्त्यांवरील खड्ड्यांचे काय? मुंबई ट्रॅफिक पोलिसांना नागरिकांचा संतप्त सवाल

दुचाकीवर स्वार असलेल्या दोघांनाही हेल्मेटसक्ती करण्याचा निर्णय मुंबई वाहतूक पोलिस(Mumbai Traffic Police)यांच्याकडून घेण्यात आला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी 9 जूनपासून करण्यात येणार आहे. नागरिकांचे प्राण वाचवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे पोलिस प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

त्यामुळे आता दुचाकी चालकासोबतच त्याच्या मागे बसणा-या व्यक्तीनेही हेल्मेट घातले नसेल, तर त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येणार आहे. या निर्णयाचे स्वागत होत असले, तरी रस्त्यावरील खड्ड्यांचे काय? असा प्रश्न आता नागरिकांकडून प्रशासनाला विचारण्यात येत आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून आता नागरिकांनी या मुद्द्यावरुन संताप व्यक्त करायला सुरुवात केली आहे.

ट्विटरवरुन नागरिकांचा संताप

मुंबई वाहतूक पोलिसांनी आपल्या ट्विटर हँडलवरुन हेल्मेटसक्तीच्या निर्णयाचे पत्रक जारी केले आहे. त्यावरच आता नागरिकांकडून संतापजनक कमेंट करण्यात येत आहेत.

हेल्मेट घातलेले असताना, गाडीचा वेग नियंत्रणात असताना सुद्धा केवळ रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे अनेक अपघात होत आहेत. सर्व नियम फक्त सर्वसामांन्यांनाच लागू केले जातात, पण ट्रॅफिक जाम, खराब रस्ते यांच्यासाठी देखील नियम लागू करण्यात यावेत.

इतकंच नाही तर ज्या भागांत रस्त्यांची दुर्दशा आहे,त्या विभागातील संबंधित अधिका-यांवर देखील कारवाई करण्यात यावी, अशी संतप्त मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

असे निर्णय लागू करण्यापूर्वी आधी रस्ते चांगले तयार करा. मुंबईतील किती रस्ते खड्डेमुक्त आहेत?, असा सवालही सोशल मीडियाच्या माध्यमातून विचारण्यात येत आहे.

रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे मुंबईत अनेक अपघात घडल्याच्या घटना दररोज घडत असतात. पावसाळ्यात या खड्ड्यांमुळे सर्वाधिक अपघात झाल्याचे पहायला मिळते. त्यामुळे हेल्मेट घातले तरी रस्त्यांवरील खड्ड्यांची डोकेदुखी कधी जाणार?, असा प्रश्न आता नागरिकांकडून विचारण्यात येत आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here