राज्यासह देशातील सध्याची परिस्थिती पाहता समाजकटंकाकड़ून जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न होत असल्याचे दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई पोलीस आता सक्रिय झाले आहेत. जातीय वाद नियंत्रणात ठेवण्यासाठी मुंबईत सोशल मीडिया लॅब सक्रिय करण्यात आली असल्याची माहिती मिळतेय. त्यामुळे तुम्ही देखील सोशल मीडियावर काही पोस्ट शेअर करत असाल? तर जरा जपून…नाहीतर तुमच्यावर मुंबई पोलिसांकडून कारवाई केली जाण्याची शक्यता आहे.
आतापर्यंत ३ हजार पोस्ट डिलीट
मुंबईत जातीय वाद नियंत्रणात ठेवण्यासाठी सोशल मीडिया लॅब सक्रिय करण्यात आल्याने आता सोशल मीडियाचा वापर करत सामाजिक तेढ निर्माण करणाऱ्यांना आता चाप बसणार आहे. मुंबई पोलिसांच्या सोशल मीडिया लॅबकडून आक्षेपार्ह पोस्टवर कारवाई करण्यात येत आहे. या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत जातीय तेढ निर्माण करु शकणाऱ्या सुमारे 3000 पोस्ट मुंबई पोलिसांनी डिलीट केल्या आहेत. रामनवमी नंतर राज्यातील काही भागात तणावाची स्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांकडून सोशल मीडियावरील पोस्टवर वॉच ठेवले जात आहे.
(हेही वाचा – वाढत्या लोडशेडिंगपासून मिळणार दिलासा! केंद्राचा दावा )
Maharashtra | 'Social Media Lab' activated to keep a vigil on the posts that could incite communal tensions in the state. Till now, 3000 such posts have been deleted: Mumbai Police
— ANI (@ANI) April 18, 2022
या प्रकरणी मुंबईत सहा गुन्हे दाखल
महाराष्ट्रात रामनवमीपासून काही ठिकाणी हिंसाचार उसळला होता. या प्रकरणी मुंबईत सहा गुन्हे दाखल झाले आहेत. पहिला गुन्हा मानखुर्द पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला. तसेच दुसरा गुन्हा मालवणी पोलीस ठाण्यात, तिसरा गुन्हा कुरारा पोलीस ठाण्यात दाखल झाला आहे. तसेच गोरेगावच्या आरे कॉलनीत एकूण तीन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, मानखुर्दच्या म्हाडा वसाहतीमधील कोयना सोसायटीजवळ ४० ते ४५ अनोळखी तरुणांच्या जमावाने वाहनांची तोडफोड केली होती. ही घटना रविवारी (दि.११) रात्री घडली होती. तरूणांच्या हातातील तलवार, लाकडी बांबू व ॲल्युमिनियम पाईपमुळे या भागात काही काळ दहशत पसरली होती. मानखुर्द प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत ३० जणांना अटक केली आहे.