‘गर्लफ्रेंडला’ भेटायचं आहे, कोणतं ‘स्टीकर’ लावू? विरहव्याकूळ तरुणाचा पोलिसांना प्रश्न! काय मिळाले उत्तर? वाचा…

विरह सहन न होऊन, या ‘लव्हबर्डस्’नी आता थेट मुंबई पोलिसांना ट्विटरवरुन साद घातली आहे. त्यांच्या या हाकेला पोलिसांनीही हटके प्रतिसाद दिला आहे.

83

‘तेरे मेरे बीच मे कैसा हैं ये बंधन अंजाना…’ काय मग आठवले की नाही वासू-सपना? आता त्या सिनेमाची आठवण करुन देण्याचं कारण म्हणजे, अशा ‘एक-दूजे के लिए’ जोडप्यांचे आता वांदे झाले आहेत. अहो का काय विचारता? ब्रेक दि चेनच्या कडक निर्बंधांमुळे आता या जोडप्यांची ताटातूट होत आहे ना राव… ‘कोरोना’ची चेन ब्रेक करता करता, आपलं ‘रिलेशन’ तर ब्रेक होणार नाही ना, अशी भीती आता या लैला-मजनूंना वाटायला लागली आहे. म्हणजे आजवर ‘लॉंग डिस्टन्स रिलेशनशिप’चा यांना अनुभव आहे, पण या ‘सोशल डिस्टन्स रिलेशनशिप’मुळे आलेला विरह सहन न होऊन, या ‘लव्हबर्डस्’नी आता थेट मुंबई पोलिसांना ट्विटरवरुन साद घातली आहे. त्यांच्या या हाकेला पोलिसांनीही हटके प्रतिसाद दिला आहे.

असे आहे तरुणाचे ट्वीट

मित्रांनो, आपल्याला माहीतच आहे की, उगाच रस्त्यावर गाड्या घेऊन फिरणा-यांमुळे होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी मुंबई पोलिसांनी स्टीकर स्ट्रॅटेजी केली आहे. याबाबतीत कोणाला काही प्रश्न असल्यास, मुंबई पोलिसांच्या ट्विटर हॅंडलवरुन त्या प्रश्नांना उत्तरे दिली जात आहेत. पण याचा गैरफायदा काही लोक घेताना दिसतात. त्यातच आपल्या गर्लफ्रेंडला भेटण्यासाठी उतावीळ झालेल्या तरुणाने पोलिसांना ट्वीट करत एक प्रश्न विचारला.

मला माझ्या गर्ल फ्रेंडला भेटायचे आहे, मला तिची खूप आठवण येते, तिला भेटण्यासाठी मी आतूर झालो आहे. तिला भेटायला जाण्यासाठी गाडीवर कोणतं स्टीकर लावू?

असा प्रश्न या ‘दिलजले’ तरुणाने केला. त्याच्या या प्रश्नाला मुंबई पोलिसांनी दिलेले उत्तर तर फारच अप्रतिम आहे.

हे आहे मुंबई पोलिसांचे उत्तर

या तरुणाच्या ट्वीटला मुंबई पोलिसांनी अत्यंत समर्पक आणि उपहासात्मक उत्तर दिले आहे.

सर, तुमच्यासाठी तुमच्या गर्लफ्रेंडला भेटणं हे किती ‘अत्यावश्यक’ आहे, ते आम्ही समजू शकतो. पण दुर्दैवाने ते आम्ही तयार केलेल्या ‘अत्यावश्यक’च्या धोरणात बसत नाही.अंतराने अंतःकरण अधिक प्रेमळ होते, त्यामुळेच तुम्ही स्वस्थ आहात. तुमचा सहवास आयुष्यभर राहो, याच तुम्हाला शुभेच्छा…

असे मुंबई पोलिसांनी या ट्वीटला दिलेल्या उत्तरात म्हटले आहे.

मित्रांना भेटून खूप दिवस झाले… काय करू?

एका तरुणाने,

“मला माझ्या मित्र-मैत्रिणींना भेटायचे आहे, आम्ही भेटून खूप काळ लोटला. त्यामुळे त्यांना भेटण्यासाठी मला गाडीवर कुठल्या स्टीकरचा वापर करावा लागेल?”

असा प्रश्न केला. तेव्हा संकटकाळी जो मदत करतो तोच खरा मित्र, या वाक्प्रचाराची नव्या रुपात मांडणी करत मुंबई पोलिसांनी उत्तर दिले.

“आपला मित्र कोविड काळात घेत असलेल्या खबरदारीचा जो आदर करतो, तोच खरा मित्र होय… कृपया घरी राहा, आम्हाला तुमच्याशी असलेले मैत्रीचे नाते तोडायचे नाही.”

असे सुंदर उत्तर मुंबई पोलिसांनी ट्वीट करत दिले. तसेच या अशाच विनाकारण भंकस करणा-या आणि स्वतःचा आणि इतरांचा वेळ वाया घालवणा-यांना, प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देणे गरजेचे नसते, असा संदेश मुंबई पोलिसांनी दिला आहे.

गांभीर्य कधी कळणार?

मुंबई पोलिस ट्विटरवरुन करत असलेले नागरिकांच्या शंकांचे निरसन, ही आताच्या काळात देत असलेली उत्तम सेवाच आहे. आज राज्यात कोरोनाचा आकडा वाढत आहे. अशावेळी प्रशासनाकडून नागरिकांच्या शक्य तितक्या अडचणी दूर करण्याचा प्रयत्न केला जात आहे. पण सेवा देणा-यांना आपले नोकर समजण्याची ही काही लोकांची वृत्ती, कधी बदलणार? कोरोनाच्या आजच्या भीषण परिस्थितीचं गांभीर्य लोकांना कधी कळणार? 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीला जे देशप्रेम जागं होतं, ते आज नियम पाळून सिद्ध करायची वेळ आहे. म्हणूनच,

घरी राहा, सुरक्षित राहा…
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.