अभिनेता सुशांत सिंह रजपूत याच्या संशयास्पद आत्महत्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी आलेल्या एनसीबीने मुंबईत अमली पदार्थाचे रॅकेट उद्धवस्त केले आहे. बॉलिवूडमधील मोठमोठ्या व्यक्तींवर कारवाई केली. सध्या किंग खानचा मुलगा आर्यन खान गजाआड आहे. त्यामुळे राज्याचे अमली पदार्थ विरोधी पथक काय करते, झोपा काढते का, अशी टीका भाजपाचे नेते वारंवार करतात. त्याचा प्रतिवाद एनसीपीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला आहे. अखेर राज्याच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने २१ कोटींचा अमली पदार्थांचा साठा जप्त करून एक प्रकारे ‘करून दाखवले’ असा संदेश दिला आहे.
काय केली कारवाई?
मुंबई पोलिसांच्या अँटी नार्कोटिक्स पथकाने सायन परिसरात मोठी कारवाई केली. पोलिसांनी एका ड्रग्स तस्कर महिलेला अटक केली असून तिच्याकडून तब्बल ७ किलो हिरोइन जप्त केले. गेल्या काही दिवसांत मुंबई पोलिसांकडून ही सर्वात मोठी कारवाई करण्यात आली आहे. पोलिसांनी जप्त केलेल्या हिरोइनची किंमत तब्बल २१ कोटी इतकी आहे. पोलिसांनी संबंधित ड्रग्स तस्कर महिलेला अटक केली असून तिची कसून चौकशी करण्यात येत आहे. संबंधित ड्रग्स प्रकरणाचे धागेदोरे राजस्थानातील प्रतापगढ परिसराशी जुळल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. दोनच आठवड्यांपूर्वी या आझाद मैदान पोलिस ठाण्यातील अमली पदार्थ विरोधी पथकाने कारवाई करून १६ कोटी रुपयांचा अमली पदार्थांचा साठा जप्त केला होता.
(हेही वाचा : ट्विटरचा आता बांगलादेशातही हिंदुद्वेष!)
आता सुरु होणार चढाओढ!
एनसीबीच्या वाढत्या कारवायाची दखल महाविकास आघाडी सरकारने राजकीय पातळीवर गंभीरतेने घेतली आहे. या कारवाया बनावट असतात, चिमूटभर ड्रग्स पकडून एनसीबी गवगवा करते, त्या तुलनेत मुंबई पोलिसांच्या कारवाया मोठ्या असतात, त्याचा मुंबई पोलिस गवगवा करत नाहीत, असे एनसीपीचे प्रवक्ते नवाब मलिक म्हणाले होते. त्यानंतर लागलीच मुंबईच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने मोठी कारवाई करून २१ कोटींचा साठा जप्त केला. तसेच त्याची माहितीही माध्यमांना देणार आहेत. अशा रीतीने आता अमली पदार्थांवरील कारवाईत मुंबई पोलिसही एनसीबीच्या विरोधात स्पर्धेत उतरले आहे का, अशी चर्चा सुरु झाली आहे.
Join Our WhatsApp Community