धारावीतील ‘के’ कंपनीचा उदय होण्यापूर्वी झाला अस्त!

138

धारावीतील ‘के’ कंपनीचा उदय होण्यापूर्वी तिचा अस्त झाला आहे. मुंबई गुन्हे शाखेने या टोळीच्या सात जणांना धारावीत झालेल्या हत्येप्रकरणी अटक केली आहे. या टोळीचा प्रमुख मागील दोन वर्षांपासून ड्रग्सच्या एका प्रकरणात आर्थर रोड तुरुंगात आहे. टोळीच्या प्रमुखासोबत त्यांच्या पूर्ण टोळीलाच जेरबंद करण्यात आल्यामुळे ही टोळी उदयास येण्यापूर्वीच तिचा अस्त झाला आहे.

धारावीतील पिला बंगला या ठिकाणी १२ फेब्रुवारी रोजी झालेल्या गोळीबारात अमीर शेख याचा मृत्यु झाला होता. अंधाधुंदपणे करण्यात आलेल्या गोळीबारात अमीर याला पाच गोळ्या लागल्या होत्या. या हत्येमुळे संपूर्ण धारावी हादरली असताना, तेथील एका ड्रग्स माफिया महिलेचे नाव समोर आले होते. याप्रकरणी धारावी पोलिसांनी ड्रग्स माफिया शमा शेख हिला अटक केली होती, चौकशीत शमा हिने हल्लेखोरांना तिच्या घरात आश्रय दिला होता हे स्पष्ट झाले.

पोलिसांची कारवाई

या प्रकरणाचा संलग्न तपास करणाऱ्या मुंबई गुन्हे शाखा कक्ष ५ च्या हाती ‘के कंपनी’ नावाच्या टोळीची माहिती लागली होती. कक्ष ५ चे प्रभारी घनश्याम नायर, पोलीस निरीक्षक सदानंद येरेकर, सहायक पोलीस निरीक्षक सुशांत बंडगर,अर्चना पाटील, संजय जगताप, अमोल माळी, जयदीप जाधव, पोलीस उपनिरीक्षक लक्ष्मण वडरे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अंकुश न्यायनिर्गुने, भुजबळ आणि पथक यांनी या टोळीच्या सहा जणांना विविध ठिकाणांहून अटक केली आहे.

( हेही वाचा : शिवाजी पार्कमध्ये कॉंक्रिटचा रस्ता? काय आहे त्यामागील कारण? )

साहिल मोहम्मद कलीम शेख, अफसर आलम अली शेख उर्फ बबलू मुल्ला, सईद शेख उर्फ सईद लंगडा, सद्दाम हुसेन, सोहेल उर्फ सोहेल पापा, यासीन अब्दुला शेख आणि शमा शेख असे अटक करण्यात आलेल्या सात जणांची नावे आहेत. अटक करण्यात आलेले सर्व जण २५ ते ३० वयोगटातील असून धारावी, वडाळा परिसरात राहणारे आहेत.

अमीर को खतम करो…

के कंपनी तयार करणारा कलीम सय्यद हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर खून, खंडणी, खुनाचा प्रयत्न, ड्रग्स तस्करी सारखे गंभीर गुन्हे दाखल आहे. अटक करण्यात आलेले सहा जण आणि तुरुंगात असलेला कलीम आणि हत्या करण्यात आलेला अमीर शेख हे सर्वजण बालपणाचे मित्र आहेत. या सर्वांनी मिळून कलीमला बॉसचा दर्जा देऊन त्याच्या नावाने के कंपनी ही टोळी तयार केली होती. २०२० मध्ये कलीम याला नवी मुंबईच्या नेरुळ येथून २० कोटीच्या ड्रग्स प्रकरणी डीआरआयने अटक केली होती. तेव्हा पासून कलीम हा आर्थर रोड तुरुंगात बंद आहे. कलीम सय्यद तुरुंगात गेल्यामुळे अमीर शेख स्वतःचे वर्चस्व गाजवू लागला होता. टोळीतील इतरांनी जानेवारी महिन्यात कलीमची ठाणे न्यायालयात भेट घेऊन ही माहिती दिली, त्याचवेळी कलीमने अमीर को खतम करो असा आदेश दिला होता.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.