दाऊदला शह देण्यासाठी मुंबईत याची ‘मचमच’

173

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याचा उजवा हात मानला जाणारा, छोटा शकीलचा विश्वासू गँगस्टर फहिम मचमचने मुंबईत हातपाय पसरायला सुरुवात केली आहे. दोन वर्षांपूर्वी दक्षिण मुंबईतील एका व्यावसायिकाला खंडणीसाठी धमकी देणारा फहिम मचमच याने गेल्या आठवड्यात घाटकोपर येथील एका बिल्डरला खंडणीसाठी धमकावले आहे.

गुन्हा दाखल

घाटकोपर पश्चिमेतील एका नामांकित बांधकाम व्यावसायिकाला गँगस्टर फहिम मचमच याने खंडणीसाठी धमकावल्याची घटना गेल्या आठवड्यात समोर आली. घाबरलेल्या बांधकाम व्यावसायिकाने मुंबई गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकात याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. गुरुवारी घाटकोपर पोलिस ठाण्यात या बांधकाम व्यावसायिकाचा जबाब नोंदवून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास खंडणी विरोधी पथक करत आहे.

फहिमची ‘मचमच’

छोटा शकील याचा विश्वासू साथीदार म्हणून ओळखला जाणारा फहिम मचमच याने मागील काही वर्षांपासून मुंबईत हातपाय पसरवायला सुरुवात केली आहे. २०१९ मध्ये फहिम मचमच याच्या चार गुंडांना खंडणी विरोधी पथकाने अटक केली होती. यामध्ये कुख्यात गुंड फजरू रेहमान खान याचा समावेश होता. यांच्याकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त करण्यात आला होता.

कोण आहे मचमच?

एकेकाळी कुर्ला, साकिनाका, घाटकोपर परिसरात छोट्या-मोठ्या खंडण्या उकळणारा फहिम मचमच, हा छोटा शकीलच्या संपर्कात आला आणि छोटा शकीलच्या इशाऱ्यावरुन त्याने मुंबईत काम सुरू केले होते. पूर्व उपनगातील तरुणांना एकत्र करुन त्याने स्वतःची टोळी तयार केली होती.

दाऊद मचमचवर होता नाराज

दाऊदचा भाऊ इक्बाल कासकर याचा मुलगा आणि दाऊदचा पुतण्या रिजवान कासकर याला मुंबई पोलिसांनी पैशांच्या वसुली प्रकरणी अटक केल्यानंतर, अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम हा भडकला होता. गुन्हेगारी क्षेत्रापासून नवीन पिढीला दूर ठेवण्याचे दाऊदने ठरवले होते. मात्र फहिम मचमच याने रिजवानला गुन्हेगारी क्षेत्रात आणले होते. फहिमच्या सांगण्यावरुन रिजवान बेकायदेशीर वसुलीच्या धंद्यात आला होता.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.