वाझेने दाखल केलेल्या गुन्ह्यांची चौकशी करा… मुंबई पोलिस आयुक्तांचे आदेश!

हे गुन्हे सूडबुद्धीने दाखल करण्यात आले असल्याचा संशय, अनेक अधिकाऱ्यांनी त्यावेळी व्यक्त केला.

88

मुंबईतील पोलिस ठाण्यात सचिन वाझेच्या सांगण्यावरुन दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्याची माहिती काढून, ती माहिती वरिष्ठ अधिकारी यांना देण्यात यावी, अशी सूचना मुंबई पोलिस आयुक्त हेमंत नगराळे यांनी मुंबईतील सर्व पोलिस ठाण्यांना दिली आहे.

आयुक्त मेहरबान, तर वाझे पहलवान

ख्वाजा युनूस प्रकरणात बडतर्फ असलेला सचिन वाझे याला १६ वर्षांनी सप्टेंबर २०२० मध्ये मुंबई पोलिस दलात पुन्हा सामावून घेण्यात आले. मुंबई पोलिस दलात येताच वाजेला मुख्य प्रवाहात सामावून घेताच त्याला गुन्हे शाखेच्या महत्वाच्या विभागाचा प्रमुख बनवण्यात आले होते. सचिन वाझेवर त्यावेळचे तत्कालीन पोलिस आयुक्त मेहरबान असल्यामुळे संपूर्ण मुंबई पोलिस दलात वाझे आपले वर्चस्व गाजवत होता. मुंबईतील अनेक पोलिस ठाण्यांत सचिन वाझेच्या सांगण्यावरुन अनेक ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले होते. हे गुन्हे सूडबुद्धीने दाखल करण्यात आले असल्याचा संशय, अनेक अधिकाऱ्यांनी त्यावेळी व्यक्त केला.

(हेही वाचाः भिवंडीच्या ‘त्या’ साठ्यातून सचिन वाझेने घेतली स्फोटके? )

वाझेचे ‘कार’नामे

पोलिस दलात येताच सहाय्यक पोलिस निरीक्षक दर्जा असणाऱ्या वाझेने आपले कारनामे दाखवण्यास सुरुवात केली. फेब्रुवारी महिन्यात त्याने मुंबईत मोठा कट रचला आणि या कटात तो अडकला गेला. या कटात त्याने मुकेश अंबानी या उद्योगपतीच्या घराजवळ स्फोटके पेरली, एवढ्यावर न थांबता त्याने ठाण्यातील व्यवसायिक मनसुख हिरेन याची हत्या घडवून आणली. या प्रकरणात सचिन वाझे स्वतः अडकलाच, पण त्याने इतर अधिका-यांना देखील अडकवले.

होणार गुन्ह्यांची चौकशी

सचिन वाझे आणि त्याच्या सांगण्यावरुन इतरांनी केलेला हा गुन्हा माफ करण्यासारखा नसल्यामुळे, वाझेसह इतर चार अधिका-यांना पोलिस सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे. ९ महिने पोलिस दलात असताना सचिन वाझे याने सूडबुद्धीने मुंबईत दाखल केलेल्या गुन्ह्यांची चौकशी करण्यात येणार असून, त्या गुन्ह्यांत काही तथ्य आढळून आले नाही, तर ते गुन्हे रद्द करण्यात येणार असल्याची माहिती पोलिस सूत्रांकडून समोर येत आहे. पोलिस आयुक्त हेमंत नगराळे यांनी गेल्या आठवड्यात मुंबईतील पोलिस ठाण्यात वरिष्ठ अधिका-यांना दिलेल्या सूचनेत, सचिन वाझेच्या सांगण्यावरुन दाखल केलेल्या गुन्ह्यांची माहिती वरिष्ठ अधिका-यांना देण्यात यावी, असे सांगण्यात आले आहे. एका वरिष्ठ अधिका-यांनी ही माहिती नाव न छापण्याच्या अटीवर सांगितली.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.