मुंबईचे नवीन पोलिस आयुक्त बनले जनसेवक! उचलले ‘हे’ पाऊल…

156

पोलीस आणि जनता यांच्यामध्ये कायम जवळचे नातेसंबंध असणे गरजेचे आहे. त्यासाठी पोलिसांनी जनतेचा मित्र बनला पाहिजे, असे अनेकदा पोलिसांच्या प्रशिक्षणात सांगितले जाते. वस्तूत: पोलीस प्रत्यक्षात फार कमी प्रमाणात असे वागतात. त्यांच्यासाठी मुंबईचे नवीन पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी आदर्श निर्माण केला आहे. जनतेशी थेट नाते जुळवण्यासाठी पांडे यांनी त्यांचा मोबाईल क्रमांक सार्वजनिक केला आहे.

मुंबईशी भावनिक नाते…

यासंबंधी भावना व्यक्त करतांना आयुक्त पांडे म्हणाले, मुंबई शहराशी आणि त्या माध्यमातून आपल्याशी माझे एक भावनिक नाते जुळलेले आहे. गेली जवळपास ३० वर्षे मी या शहरात आणि पोलीस दलात विविध पदांवर काम केले आहे. मुंबई पोलिसांची स्वतःची एक गौरवशाली परंपरा आणि इतिहास आहे. किंबहुना मुंबईच्या पोलिसांची नेहमीच स्कॉटलंडच्या पोलिसांशी तुलना होत आली आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई पोलीस दलाचा आयुक्त या नात्याने मुंबईकर जनतेची सेवा करण्याची संधी मला मिळाली आहे. जे माझ्यासाठी गौरवास्पद आणि अभिमानाचे आहे, असेही आयुक्त संजय पांडे म्हणाले.

(हेही वाचा ओबीसी आरक्षणाशिवाय आता निवडणुका होणार! कारण…)

जनतेला सूचना करण्याचे आव्हान…

या कठीण काळात आणि एकूणच कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टीने आपल्यालाही अनेक अडचणी भेडसावत असणार. त्यामुळे मुंबई पोलीस दलाच्या कामकाजात काही सुधारणा होणे आवश्यक वाटत असल्यास व त्याबाबत आपल्या काही सूचना असल्यास मला 9869702747 या क्रमांकावर जरूर कळवा. अनेकवेळा अगदी छोट्या सूचनाही मोठे बदल घडवून आणू शकतात. त्यामुळे योग्य सूचनांची दखल घेऊन त्यानुसार बदल घडवून आणण्याचा निश्चितपणे प्रयत्न केला जाईल! दुसरीकडे मुंबई पोलीस दलातील सर्व अधिकारी व अमलदारांच्या साथीने मी मुंबईकर जनतेला आश्वस्त करू इच्छितो, की त्यांच्या मदतीसाठी, संरक्षणासाठी आणि एकूणच कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी मुंबई पोलीस २४ तास सज्ज आहेत, असेही आयुक्त संजय पांडे म्हणाले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.