विरुद्ध दिशेने वाहने चालवणाऱ्या ३६ चालकांवर गुन्हे दाखल

101

मुंबईत एक दिशा मार्गाने वाहने चालवणाऱ्या वाहन चालकाविरुद्ध मुंबईत गुन्हे दाखल करण्यास सोमवार पासून सुरुवात करण्यात आली आहे. सोमवारी दिवसभरात मुंबईतील विविध ठिकाणी पोलीसांनी ३६ वाहन चालकाविरुद्ध वाहन नियम कायदा अंतर्गत गुन्हे दाखल केले आहेत. दरम्यान मुंबईतील रस्त्यावर बेवारसरित्या पडलेल्या २६६ खटारा वाहने काढण्यात आली असल्याची माहिती खुद्द पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी ट्विटर वर दिली आहे.

( हेही वाचा : पोलिसांच्या सुविधेसाठी देण्यात आलेले तंबू बनले अडचणीचे )

३६ गुन्हे दाखल

मुंबईतील वाहतूक कोंडी आणि अपघात टाळण्यासाठी पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी एक दिशा मार्गावर विरुद्ध दिशेने वाहन चालवून वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहन चालकांवर थेट गुन्हे दाखल करण्याचे आदेश वाहतूक पोलिसांना दिले आहेत. सोमवारी या आदेशाची अंमलबजावणी करण्यात आली असून मुंबईतील विविध वाहतूक विभागाने सोमवारी दिवसभरात एक दिशा मार्गावर विरुद्ध दिशेने वाहन चालविणाऱ्या वाहन चालकांवर विविध पोलीस ठाण्यात ३६ गुन्हे दाखल केले आहेत. वाहतूक नियम कायदा अंतर्गत हे गुन्हे दाखल करण्यात आले असल्याची माहिती पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी आपल्या ट्विटर हँडल वर दिली आहे. तसेच रस्त्याच्या बाजूला अनेक वर्षांपासून पार्क करून ठेवण्यात आलेल्या २६६ खटारा वाहने मुंबईच्या रस्त्यावरून हटविण्यात आली असून रस्ते मोकळे करण्यात आले असल्याची माहिती पांडे यांनी दिली आहे.

दाखल करण्यात आलेले गुन्हे जामीनपात्र असून या गुन्ह्यात पोलीसांना जागेवर टेबल जामीन देण्याचा अधिकार असल्यामुळे गुन्हे दाखल झालेल्या वाहन चालकांना अटक करून जामिनावर सोडण्यात आले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.