१३ हजार वाहन चालकांवर गुन्हे दाखल, विनाहेल्मेट प्रकरणात ४ हजार जणांवर कारवाई

विरुद्ध दिशेने वाहने चालवून स्वतःच्या आणि दुसऱ्याच्या जीवाला धोका पोहचविणाऱ्या १२ हजार ३९० वाहन चालकांवर मागील दोन महिन्यांत मुंबईत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्याचसोबत विनाहेल्मेट दुचाकी चालविणाऱ्या ४ हजार २१४ जणांवर कारवाई करण्यात आली असून रस्त्याच्या कडेला असलेली १३ हजार ४३० बेवारस वाहने दोन महिन्यात उचलण्यात आली आहेत. ही आकडेवारी मुंबई पोलिसांकडून देण्यात आली आहे.

गुन्हे दाखल करण्याचे आदेश

मुंबईतील वाहतूककोंडी तसेच अपघात टाळण्यासाठी मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी विरुद्ध दिशेने वाहन चालविणाऱ्यांवर थेट गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. त्याचसोबत रस्त्याच्या कडेला बेवारसरित्या असलेली खटारा वाहने हटविण्याचे आदेशात म्हटले होते. ही कारवाई सुरू होऊन २ महिने झाले असून या दोन महिन्यांत मुंबईतील विविध पोलीस ठाण्यात विरुद्ध दिशेने वाहन चालविणाऱ्या १२ हजार ३९० वाहन चालकांवर मोटार वाहन कायदाअंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्याचसोबत ४ हजार २१४ विनाहेल्मेट दुचाकीस्वरांवर दंडाची कारवाई करण्यात आली आहे. या दरम्यान वाहतूक पोलिसांनी महानगरपालिकेच्या मदतीने रस्त्याच्याकडेला उभी असणारी १३ हजार ४३० खटारा वाहने उचलली आहेत.

( हेही वाचा : १९ मे रोजी संदीप देशपांडेंना अटक होणार?)

पोलिसांनी दोन महिन्यात सुरू केलेल्या कारवाईमुळे शहरातील तसेच उपनगरातील वाहतुकीमध्ये सुधारणा झाली आहे. एकीकडे आयुक्तांच्या या कारवाईचे अनेकांनी स्वागत केले असले तरी गुन्हे दाखल करण्यात आलेल्या वाहन चालकांमध्ये काहीशी नाराजी दिसून येत आहे. गुन्हे दाखल झाल्यामुळे अनेकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. काही पोलीस ठाण्यांनी हे गुन्हे निकाली काढण्यासाठी गुन्हे दाखल झाल्यांच्या ७ दिवसांत न्यायालयात आरोपपत्र दाखल केले आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here