मुंबई पोलीस दलाच्या बॉम्ब शोधक नाशक पथकातील ७ वर्षे ७ महिन्याचा श्वान ‘राणा’ याने परळच्या बाई साकराबाई पशुवैद्यकीय रुग्णालयात मंगळवारी अखेरचा श्वास घेतला. राणा या श्वानाच्या पोटातील गाठीवर शस्त्रक्रिया करण्यात येणार होती, तत्पूर्वी केलेल्या इतर तपासणीमध्ये त्याच्या रक्तात हिमोग्लोबिनचे आणि प्लेटलेसचे प्रमाण कमी झाले होते, त्याने मागील काही दिवसांपासून खाणेपिणे सोडले होते आणि तो औषधांना प्रतिसाद देत नव्हता अशी माहिती पोलिसांनी दिली.
हिमोग्लोबिनचे आणि प्लेटलेसचे प्रमाण कमी झाले
लॅब्रॉडर जातीचा ‘राणा’ हा श्वान मुंबई पोलीस दलात ३ सप्टेंबर २०१५ दाखल झाला होता. ६ महिन्याच्या प्रशिक्षणानंतर राणा हा बॉम्ब शोधक-नाशक पथकात सामील झाला होता. राणाच्या देखभालीसाठी श्वान हस्तक म्हणून पोलीस अंमलदार तानाजी पवार व सुनील सत्यवान यांची नियुक्ती करण्यात आली होती. राणा श्वानाने कर्तव्यकाळात बॉम्ब शोधक व नाशक पथकासोबत बॉम्ब कॉल, थ्रेट कॉल, संशयित वस्तूंची तपासणी करणे, व्हीव्हीआयपी, व्हीआयपी यांच्या मुंबई भेटीदरम्यान घातपात विरोधी तपासणी करणे, इत्यादी घातपात विरोधी तपासणीमध्ये यशस्वीरित्या सहभाग घेतला होता.
२२ जुलै रोजी राणाचे पोट फुगल्याने त्याला औषधोपचारासाठी परळ येथील बाई साकराबाई पशुवैदयकिय रुग्णालय या ठिकाणी आणण्यात आले होते. महिनाभर त्याच्यावर उपचार सुरू होते, दरम्यान त्याला नैसर्गिक विधी होत नसल्यामुळे त्याला रुग्णालयात दाखल करून त्याच्यावर उपचार सुरू करण्यात आले. रुग्णालयात त्याची सोनोग्राफी करण्यात आली असता त्याच्या पोटात एक गाठ आढळली. राणाच्या पोटातील गाठ शस्त्रक्रिया करून काढण्यापूर्वी त्याच्या काही तपासण्या करण्यात आल्या, त्यात त्याच्या रक्तात हिमोग्लोबिनचे आणि प्लेटलेसचे प्रमाण कमी झाल्याचे आढळून आल्यामुळे त्याची शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात आली होती.
( हेही वाचा : मंत्री तानाजी सावंतांनी पुन्हा केले ‘ते’ वादग्रस्त वक्तव्य)
राणाची प्रकृती अधिकच खालावत गेली व त्याने खाणेपिणे सोडून दिले व तो औषधाला प्रतिसाद देत नव्हता. मंगळवारी रात्री साडेदहा वाजता त्याने रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. मृत्यूच्या वेळी राणा श्वानाचे वय ७ वर्षे ७ महिने होते. राणा या श्वानावर बुधवारी बाई साकराबाई पशु वैदयकिय रुग्णालय, परळ या ठिकाणी शासकीय इतमामात सन्मान गार्ड मार्फत सलामी देऊन अंत्यविधी करण्यात आला.
Join Our WhatsApp Community