महाराष्ट्र पोलिसांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. यापुढे महाराष्ट्र पोलिसांनी खाकी वर्दी घालून नाचू नये, अशा स्पष्ट सूचना जारी करण्यात आल्या आहेत. गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीत अनेक पोलिसांचे नाचतानाचे व्हिडीओ समोर आले होते. या व्हिडीओवरुन सोशल मीडियावर बरीच चर्चा झाली. पोलिसांनी मिरवणुकीत नाचणे कितपत योग्य असा प्रश्न समाज माध्यमातून विचारला गेला. त्यानंतर आता पोलीस महासंचलकांनी याची दखल घेतली आहे.
राज्य पोलीस महासंचालक कार्यालयातून महत्त्वपूर्ण सूचना पोलीस दलातील सर्व कर्मचा-यांना जारी करण्यात आल्या आहेत. त्यानुसार यापुढे खाकी वर्दीत किंवा गणवेशात पोलीस नाचताना दिसले, तर त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे. त्यामुळे वर्दीत कुणीही नाचू नये, अशा सूचना पोलिसांना देण्यात आल्या आहेत.
( हेही वाचा: IRCTC Booking : आता चॅटबॉटद्वारे करता येणार रेल्वे तिकिटांचे बुकिंग )
अधिकृत पत्रक जारी करत पोलिसांना सूचना
गणपती विसर्जनात नाचलेल्या पोलिसांचे व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले. त्यावरुन वाददेखील झाला. अखेर या सगळ्या प्रकाराची पोलीस खात्याकडून गंभीर दखल घेण्यात आली आहे. आता राज्याच्या पोलीस महासंचालक कार्यालयातून अधिकृत पत्रक जारी करत पोलिसांना सूचना करण्यात आल्या आहेत. दोन दिवसांपूर्वीच खाकी वर्दीत नाचू नका, असा सूचना मुंबई पोलिसांना अतिरिक्त पोलीस महासंचलकांनीही दिल्या होत्या. गणवेशात नाचताना आढळल्यास कारवाई करण्याचे निर्देशही देण्यात आले होते.