झोमॅटो बॉय बनून पकडले सोनसाखळी चोराला

66

मुंबईत सोनसाखळी चोरांनी धुमाकूळ घातला आहे, जेष्ठ नागरिक आणि महिलांना लक्ष करणाऱ्या हे सोनसाखळी चोर आपले सावज हेरून काही क्षणात चोरी करून मोटारसायकलवरून पोबारा करतात. या सोनसाखळी चोरांना पकडण्यासाठी विनोबा भावे नगर पोलिसांनी एक नामी शक्कल लढवून एका सराईत सोनसाखळी चोराला अटक केली आहे. झोमॅटो डिलेव्हरी बॉय आणि सुरक्षा रक्षकाची वेशभूषा करून पोलिसांनी या सोनसाखळी चोराच्या मुसक्या आवळल्या आहेत. या चोराला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांना सोनसाखळी चोरांच्या कुटूंबातील महिलांचा सामना करावा लागल्याचा प्रकार कुर्ला पश्चिम येथे नुकताच उघडकीस आला आहे.

कुर्ला कमानी जंक्शन या ठिकाणी काही दिवसांपूर्वी पहाटेच्या सुमारास मोटारसायकलवरून आलेल्या दोघांनी एका महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी चोरून पळ काढला होता. याप्रकरणी विनोबा भावे नगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता, या सोनसाखळी चोरांचा शोध घेण्यासाठी वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेश पवार यांनी पोलिसांचे एक पथक गठीत केले होते. या पथकात पोलिस उपनिरीक्षक पद्माकर पाटील, पोलिस अंमलदार गवारे, निळे, गोविंद देवळे, केसरकर, नरबट यांच्या पथकाने कमानीपासून घाटकोपर एलबीएस रोडवर असलेले सीसीटीव्ही फुटेज तपासले असता काही फुटेजमध्ये सोनसाखळी चोराची मोटारसायकल मिळाली, तसेच काही फुटेजमध्ये हे दोन्ही सोनसाखळी चोर स्पष्टपणे दिसले. पोलिसांनी मोटरसायकलचा माग काढला असता ही मोटारसायकल विद्याविहारच्या दिशेने गेल्याचे दिसून आले, पोलिसांनी विद्याविहार परिसरात शोध घेतला असता सोनसाखळी चोराची मोटारसायकल एका ठिकाणी पार्क केल्याचे दिसून आले.

हेही वाचा : महाराष्ट्रातील कोरोना निर्बंध अजून कडक होणार? राजेश टोपेंचा इशारा )

तसेच हे दोघे चोर काही अंतर चालत गेले आणि पुढे जाऊन त्यांनी रिक्षा पकडली, त्यानंतर त्यांना एलबीएस रोडवरील नाझ हॉटेल जवळ सोडले, तेथून पुढे त्यांना एका स्कुटरवरून घाटकोपरच्या दिशेने नेले. तपास पथकाने सुमारे ४० सीसीटीव्ही फुटेज तपासले असता पोलिसांना बऱ्यापैकी सोनसाखळी चोराचा माग काढता आला. आता वेळ होती या दोघांना पकडण्याची. हे दोघे मोटारसायकल घेण्यासाठी नक्की येणार म्हणून वपोनि. राजेश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोउनि. पद्माकर पाटील यांनी आपले दोन अंमलदार सुरक्षा रक्षक बनून पार्क करण्यात आलेल्या मोटारसायकलपासून काही अंतरावर एका  बँक एटीएम जवळ ठेवली. तर इतर दोन अमलदारांना झोमॅटो बॉय बनवून स्कुटरचा माग काढण्यासाठी एलबीएस मार्गावरील एका दर्गा येथील वस्तीजवळ पाठवले. झोमॅटो बॉय आणि सुरक्षा रक्षकांनी आपली कामगिरी चोख बजावत स्कुटर शोधून काढली. ही स्कुटर या वस्तीजवळ पार्क करण्यात आली होती. या स्कुटरची माहिती मिळवली असता ही स्कुटर आंबिवलीतील एका इराणी व्यक्तीच्या नावावर नोंद असल्याचे कळले. ही स्कुटर घाटकोपर  एलबीएस रोड येथील दर्गाजवळ असणाऱ्या इराणी वस्तीत राहणारे दोघे जण वापरत असल्याची माहिती मिळाली.

पोउनि पदमाकर पाटील आणि पथक असे एकूण सहा जणांचे पथक साध्या वेशात सोमवारी या वस्तीजवळ दाखल झाले. दरम्यान हे दोघे सोनसाखळी चोर तेथील एका मोकळ्या जागेत बसले होते, पोलिसांनी त्यांना ओळखताच पोलिसांनी दोघांवर झडप टाकली. वस्तीत आरडाओरड झाल्यामुळे या सोनसाखळी चोरांचे नातलग महिला त्या ठिकाणी आल्या आणि पोलिसांना विरोध करू लागल्या. या झटापटीत एक आरोपी पोलिसांच्या हातून निसटला मात्र दुसऱ्याला पोलिसांनी पकडून ठेवले होते. दरम्यान पोलिसांनी पोलिस ठाण्यात फोन करून अधिक मदत मागितली. काही वेळातच वपोनि. पवार आणि पार्कसाईड पोलिस ठाण्याचे वपोनि दिवाकर शेळके आपल्या पथकासह घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी या महिलांना शांत करून आरोपी फैजल इराणी (२८) याला अटक करून पोलिस ठाण्यात घेऊन आले. फैजल आणि त्याच्या साथीदारावर मुंबई, ठाणे परिसरात १५ पेक्षा अधिक सोनसाखळीचे गुन्हे दाखल असल्याची माहिती पवार यांनी दिली असून हे दोन्ही आरोपींना यापूर्वी ठाणे पोलिसांनी मोक्का अंर्तगत अटक केली होती, अशी माहिती पवार यांनी दिली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.