जिल्ह्याबाहेरील बदल्यांमुळे मुंबई पोलीस दलात मनुष्यबळाचा तुटवडा

मुंबईतील वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेत मुंबई पोलीस दलाची संख्या अपुरी पडत आहे. मागील तीन वर्षांत मुंबई पोलीस दलात नवीन पोलीस भरती झालेली नाही. राज्याचे तत्कालीन पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी मुंबई पोलीस दलातील हजारो पोलीस अंमलदाराची जिल्ह्याबाहेर बदली केल्यामुळे मनुष्यबळाच्या कमतरतेत आणखी भर पडली आहे. त्यामुळे अशा अपुऱ्या मनुष्यबळामध्ये कसे काम करावे, अशी चिंता अनेक पोलीस अधिका-यांनी व्यक्त केली आहे.

अपुऱ्या मनुष्यबळात पोलीस दलाचा गाडा चालवावा लागतो

मुंबई पोलीस दलातील अपुऱ्या मनुष्यबळात गणेशोत्सवाला बंदोबस्त पुरवणे हे मुंबई पोलिसांसमोर मोठे आव्हान होते. मात्र मुंबईतील गणेशोत्सव मोठ्या उत्सवात आणि शांततेत पार पडला, याचे सर्व श्रेय मुंबई पोलीस दलाल जाते. मुंबईची लोकसंख्या १ कोटी ८५ लाखापेक्षा अधिक आहे, एवढ्या मोठ्या लोकसंख्येमागे मुंबई पोलीस दलात ४९ हजार पोलिसांचे मनुष्यबळ आहे. त्यात देखील २० टक्के घट झाली असल्यामुळे अपुऱ्या मनुष्यबळात मुंबई पोलीस आयुक्तांना पोलीस दलाचा गाडा चालवावा लागत आहे. मुंबई शहराच्या सुरक्षेची आणि कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी मुंबई पोलिसांवर आहे. मात्र, अपुरे मनुष्यबळ व कामाच्या ठिकाणी असलेल्या अपुऱ्या सुविधा यामुळे पोलीस खात्यावर प्रचंड ताण असल्याचे प्रजा फाउंडेशनच्या २०२० अहवालात समोर आले होते.

(हेही वाचा वक्फ बोर्डाचा मनमानी कारभार! हिंदू बहुसंख्य असलेल्या संपूर्ण गावावरच सांगितली मालकी)

कामाचा अतिरिक्त ताण असूनही अहोरात्र काम

मुंबई पोलीस दलामध्ये उपलब्ध मनुष्यबळाचा विचार केला, तर सध्या २० टक्के मनुष्यबळ कमी असल्याचे मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी सांगितले. तत्कालीन पोलीस महासंचालक संजय पांडे यांच्या काळात मुंबई पोलीस दलातील हजारो पोलीस अंमलदारांच्या जिल्ह्याबाहेर बदल्या करण्यात आल्यामुळे मुंबई पोलीस दलात मनुष्यबळाच्या कमतरतेत अधिकच भर पडली आहे. २०१९ मध्ये मुंबई पोलीस दलात शेवटची पोलीस भरती झाली होती, त्यानंतर अद्याप पोलीस भरती झालेली नाही. प्रत्येक वर्षी शेकडोच्या संख्येने पोलीस अंमलदार सेवानिवृत्त होत आहेत, तसेच पोलीस दलात आजारापणाने मृत्यू होणाऱ्यांची संख्या देखील मोठी आहे. कमी मनुष्यबळात देखील मुंबईतील पोलीस कुठलीही कुरकुर न करता अहोरात्र सेवा देताना दिसतात. लॉकडाऊन काळामध्ये मुंबई पोलिसांनी वेगवेगळ्या जबाबदाऱ्या चांगल्या रीतीने सांभाळल्या आहेत.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here