पोलिस दलाची मलीन झालेली प्रतिमा सुधारण्यासाठी आपम प्रयत्न करणार असल्याचे सांगत मुंबई पोलिस आयुक्तपदी नियुक्ती झालेल्या हेमंत नगराळे यांच्याकडून आता मुंबई पोलिस दलात मोठे फेरबदल करण्यात येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. गुन्हेशाखेत देखील मोठे बदल करुन गुप्तवार्ता पथक अर्थात सीआययुचे काही अधिकार काढून घेण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे.
नगराळे यांनी दिले संकेत
मुकेश अंबानी यांच्या घराजवळ आढळून आलेली स्फोटकांनी भरलेल्या कार प्रकरणी गुन्हे शाखेचे अधिकारी सचिन वाझे यांना राष्ट्रीय तपास यंत्रणा(एनआयए)ने अटक केली आहे. सचिन वाझे यांच्या अटकेमुळे व त्यांनी केलेल्या कृत्यामुळे मुंबई पोलिसांची डागाळलेली प्रतिमा सुधारण्यासाठी मुंबई पोलिस दलात मोठे फेरबदल करण्यात येणार असल्याचे संकेत मुंबईचे नवीन पोलिस आयुक्त हेमंत नगराळे यांनी दिले आहेत.
काय असू शकतो बदल?
गुन्हे शाखेच्या अंतर्गत येणारे गुप्तवार्ता पथक(सीआययु)चे काही अधिकार काढून घेण्यात येणार असून, या पथकाकडे असलेल्या महत्वाचे गुन्हे तपास गुन्हे शाखेच्या इतर पथकांकडे सोपवण्यात येणार असल्याची माहिती, खास सूत्रांनी दिली आहे. दरम्यान पोलिस उपायुक्त, अप्पर पोलिस आयुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांमध्ये देखील मोठे फेरबदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
Join Our WhatsApp Community