मुंबईत पोलिस यंत्रणेची रॅपिड अ‍ॅक्शन! मुंबईला धोका वाढला?

मुंबई शहरात अधिक काळजी घेतली जात असून, बुधवारपासून मुंबईत रॅपिड अ‍ॅक्शन फोर्सच्या तुकड्या जागोजागी तैनात करण्यात येत आहेत.

दहशतवाद्यांच्या ‘हिटलिस्ट’वर असलेल्या मुंबईची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. दिल्लीत अटक करण्यात आलेल्या दहशतवाद्यांपैकी एक दहशतवादी मुंबईतील असल्यामुळे सुरक्षा यंत्रणेकडून मुंबईची विशेष काळजी घेतली जात आहे. ऐन सणासुदीच्या दिवसांत मुंबईत कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून मुंबईच्या रस्त्यांवर रॅपिड अ‍ॅक्शन फोर्स(शीघ्र कृती दल)चा रुट मार्च काढण्यात येत आहे. तर दुसरीकडे गुन्हे शाखेकडून अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम टोळीवर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. एटीएसकडून दहशतवादी संघटनांच्या राज्यभरातील स्लीपर सेलची माहिती मिळवण्यात येत आहे.

म्हणून मुंबईत कडक बंदोबस्त

मुंबईसह राज्यात उत्सवाचे वातावरण तसेच सणासुदीचे दिवस सुरू आहेत. या उत्सवाला गालबोट लागू नये अथवा मुंबईला असलेला दहशतवाद्यांचा धोका लक्षात घेता मुंबई पोलिस यंत्रणा तसेच राज्य दहशतवाद विरोधी पथक (एटीएस) सतर्क झाले आहे. दिल्ली पोलिसांनी अटक केलेल्या ६ दशतवाद्यांपैकी एक दहशतवादी हा मुंबईतील निघाल्यामुळे, तसेच या दहशतवाद्यांच्या निशाण्यावर देशातील इतर शहरांसह मुंबई शहर देखील असल्याचे दिल्ली पोलिसांच्या तपासात उघड झाले आहे. या शहरामध्ये घातपात घडवून आणण्यासाठी पाकिस्तानातील आयएसआय संघटनेकडून अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा भाऊ अनिस इब्राहिमची मदत घेतली जात असल्याचे समोर आले आहे. दिल्ली पोलिसांच्या अटकेत असलेला जान मोहम्मद उर्फ समीर कालिया अली मोहंमद शेख हा दशतवादी मुंबईतील सायन धारावी येथे राहणारा असून, दाऊद टोळीचा सदस्य असल्याचे उघड झाले आहे.

(हेही वाचाः मुंबई लोकलच्या सुरक्षेसाठी नवीन मॉडेल! दहशतवाद्यांना पकडल्यावर आली जाग)

सुरक्षा यंत्रणा सतर्क

या सर्व पार्श्वभूमीवर राज्यातील सुरक्षा यंत्रणा सतर्क झाली आहे. मुंबई शहरात अधिक काळजी घेतली जात असून, बुधवारपासून मुंबईत रॅपिड अ‍ॅक्शन फोर्सच्या तुकड्या जागोजागी तैनात करण्यात येत आहेत. तसेच स्थानिक पोलिसांच्या मदतीने रॅपिड अ‍ॅक्शन फोर्स सोबत रुट मार्च काढला जात आहे. मुंबईतील काळाचौकी, परळ, माटुंगा, दादर, सायन, वडाळा, एंटोप हिल आदी परिसरात बुधवार आणि गुरुवारी रुट मार्च काढण्यात आले आहे. मुंबई पोलिस दलाला विशेष काळजी घेण्याचे आदेश वरिष्ठांकडून प्राप्त झाले आहेत. परिसरातील संशयास्पद व्यक्ती आणि त्यांच्या हालचालींवर विशेष लक्ष केंद्रित केले जात आहे. मुंबईतील हॉटेल, लॉज, बोर्डिंगची पोलिसांकडून तपासणी केली जात असून, लॉज मालकांना सूचना देण्यात आलेल्या आहेत.

रेल्वेच्या सुरक्षेतही वाढ

मुंबई लोहमार्ग पोलिस, रेल्वे सुरक्षा बल(आरपीएफ)कडून रेल्वेची सुरक्षा वाढवण्यात आलेली आहे. लोकल ट्रेन, परराज्यातून येणा-या ट्रेन, लांब पल्ल्याच्या गाड्यांची तपासणी तसेच लोकल ट्रेनच्या सुरक्षेत वाढ करण्यात आलेली आहे. श्वान पथके, बॉम्ब शोधकॉ व निकामी पथकांना सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

(हेही वाचाः जान मोहम्मदवर २० वर्षांपूर्वी दाखल झाला होता गुन्हा… काय म्हणाले एटीएस प्रमुख?)

दाऊद टोळीवर गुन्हे शाखेचे विशेष लक्ष

दिल्ली पोलिसांनी अटक केलेल्या दशतवाद्यांपैकी मुंबईतील एक दशतवादी दाऊद टोळीशी संबंधित असल्यामुळे, तसेच दाऊद टोळीचे दहशतवादी यांच्याशी असलेले कनेक्शन उघड झाल्यानंतर मुंबई गुन्हे शाखेने दाऊद टोळीवर आपले विशेष लक्ष केंद्रित केले आहे. गुन्हे शाखेकडून दाऊद टोळीच्या गुंडांची यादी तयार केली जात असून, या गुंडांवर विशेष लक्ष ठेवण्यात येत आहे. तसेच १९९३च्या साखळी बॉम्बस्फोटातील सुटलेल्या आरोपींच्या प्रत्येक हालचालीवर गुन्हे शाखेचे बारीक लक्ष असून, त्यांच्या संपर्कात असलेल्यांची माहिती काढण्यात येत आहे.

दाऊदची गँग रडारवर

दिल्ली पोलिसांनी अटक केलेला जान मोहम्मद हा दहशतवादी मुंबईत दाऊद टोळीशी संबंधित कुणाच्या संपर्कात होता याची माहिती काढण्यात येत आहे. दाऊद टोळीतील तुरुंगात असलेले गुंड, तसेच बाहेर असलेल्या लोकांवर तपास यंत्रणेचे बारीक लक्ष आहे. अनिस इब्राहिमशी संबंधित व्यक्तींना चौकशीसाठी ताब्यात घेतले जात आहे. मुंबईतून हवाला रॅकेट चालवणारे गुन्हे शाखा आणि एटीएसच्या रडारवर आले आहेत. दिल्लीत पकडल्या गेलेल्या दहशतवाद्यांचे अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचे कनेक्शन समोर येताच या टोळीतील मुंबईतील अनेक जण अंडरग्राऊंड झाले असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या सूत्रांनी दिली आहे. या घटनेनंतर गुन्हे शाखेने आपल्या जुन्या खबऱ्यांचे नेटवर्क पुन्हा एकदा मजबूत करण्यास सुरुवात केली आहे. या खबऱ्यांच्या मार्फत गुन्हे शाखा दाऊदच्या एकेक गुंडावर तसेच अनिस इब्राहिमच्या संपर्कात असणाऱ्यांना ट्रॅक करणार आहे.

(हेही वाचाः जान मोहम्मदच्या वरच्या खोलीचे काय आहे रहस्य?)

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here