मुंबईत ज्या वेळी गॅंगवॉर सुरू होते, त्यावेळी गुंड टोळ्यांकडून एकमेकांच्या प्रतिस्पर्धी टोळीतील सदस्यांना संपवले जात होते. त्यावेळी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखा मजबूत करण्यात आल्या. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेत सुरेश वालीशेट्टी, विजय साळसकर, प्रफुल्ल भोसले, नागेश लोहार, दया नायक, दिनेश कदम, प्रदीप शर्मा, महेश देसाई या अधिका-यांनी मुंबईची कमान सांभाळली. या अधिकाऱ्यांनी अनेक टोळ्यांच्या गुंडाना चकमकीत ठार केले. मात्र या चकमकीत मारले गेलेल्या गुंडांपैकी अरुण गवळी टोळीच्या सदस्यांचे प्रमाण खूप कमी होते. याचे कारण म्हणजे दगडी चाळीच्या त्या भिंती…
दगडी चाळीत होत्या गुहा
मुंबई पोलिसांच्या चकमकीला घाबरुन, गवळी टोळीचे सदस्य दगडी चाळीत दडून बसत होते. दगडी चाळीत टोळीच्या सदस्यांना लपवण्यासाठी भिंती खोदून त्या ठिकाणी अनेक गुहा तयार करण्यात आलेल्या होत्या. तसेच एका खोलीतून दुसऱ्या खोलीत जाण्यासाठी ड्रेनेज लाइनमार्गे घेऊन जाणारे बोगदे खोदण्यात आले होते. अशी दगडी चाळीत लपण्यासाठी रचना करण्यात आली होती, असे गुन्हे शाखेचे अधिकारी दिनेश कदम यांनी सांगितले.
(हेही वाचाः डॅडींच्या दगडी चाळीचा ‘इतिहास’! (भाग-1))
दगडी चाळीत मालमत्ता विकणे कठीण
गवळी टोळीला संपवण्यात दाऊदला कधीही यश आले नाही. दगडी चाळीच्या अवतीभोवती देखील एखादी संशयित व्यक्ती दिसली, की त्याची कसून चौकशी होत होती. या चाळीत नवीन भाडेकरू येऊ शकला नाही आणि गवळीच्या परवानगीशिवाय येथील मालमत्ता कोणीही विकू शकला नाही. जर ती विकायची असेल तर गवळी ती मालमत्ता स्वतः खरेदी करत असत, अशी माहिती दिनेश कदम यांनी दिली आहे.
१९९८ मध्ये दगडी चाळीत तिघांचं एन्काऊंटर
भांडुप हा परिसर एकेकाळी अनेक गुंड वास्तव्यास होते. भांडुपमध्ये दररोज गॅंगवॉर होत होते. त्यात अरुण गवळी टोळीच्या काही गुंडांची दहशत भांडुपमध्ये होती. या तिघांना अटक करण्यासाठी मुंबई गुन्हे शाखेच्या घाटकोपर युनिटचे प्रभारी प्रफुल्ल भोसले, हेमंत देसाई, अशोक खोत यांच्या पथकाने या तिघांचा शोध सुरू केला. हे तिघे दगडी चाळीत बसल्याची माहिती मिळताच भोसले, खोत, देसाई हे आपल्या पथकासोबत दगडी चाळीत शिरले. त्यावेळी चाळीतच पोलिसांची या गुंडांसोबत चकमक उडाली आणि या पोलिस पथकाच्या कारवाईत हे तिघे गुंड दगडी चाळीतच मारले गेले. त्यावेळी अरुण गवळी चाळीतच लपून बसला होता, अशी माहिती या पथकातील एका अधिकाऱ्याने दिली.
(हेही वाचाः …आणि ‘दगडी चाळ’ बनली गवळीचे साम्राज्य!)
चकमक फेम विजय साळसकरांना घाबरत होता गवळी
९०च्या दशकात एन्काउंटर स्पेशालिस्ट म्हणून अनेक अधिकाऱ्यांची नावे समोर आली. त्यापैकी पोलिस निरीक्षक विजय साळसकर हे एक नाव. २६/११च्या दहशतवादी हल्ल्यात वीरगती प्राप्त झालेले विजय साळसकर यांची दाऊद, राजन, अश्विन नाईक आणि अरुण गवळी यांच्या मनात दहशत होती. साळसकर या नावानेच अनेक गुंड चळाचळा कापत असत. अनेक गुंडांना, टोळी प्रमुखांना चकमकीत ठार करणारे साळसकर या अधिकऱ्याला अरुण गवळी सर्वात अधिक घाबरत होता. साळसकर यांनी अनेक वेळा दगडी चाळीत घुसून, गवळीच्या अनेक गुंडांना फरफटत आणले होते, अशी माहिती एका पोलिस अधिका-यांनी दिली आहे. साळसकर एके दिवशी आपल्याला चकमकीत ठार करतील, ही भीती गवळीला वाटत होती.
(हेही वाचाः ‘ती’ घटना घडली आणि दगडी चाळीची ‘दहशत’ निर्माण झाली!)
निवडणुकीच्या वेळी विजय साळसकर यांना आग्रीपाडा पोलिस ठाण्यात बसवण्यात आले होते, दगडी चाळ ही आग्रीपाडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत होती. विधानसभेच्या निवडणुकीत अरुण गवळी उभा होता. मात्र, साळसकर यांच्या भीतीने तो त्यावेळी चाळीतून बाहेर पडला नाही.